
गणेश कवडे , साम प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही, अशा कडक शब्दात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. बांगला देशात हिंदू धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय, त्यावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होताहेत. इस्कॉनचं मंदिर जाळण्यात आलं. त्यांच्या प्रमुखांना अटक झाली तरीही पंतप्रधान मोदी गप्प आहेत. माझी तमाम हिंदूंतर्फे पंतप्रधान मोदींना विनंती आहे की, जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होताहेत, त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. नुसतं इथे बटेंगे, कटेंगे, फटेंगे वगैरे करुन उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवू नका. जिथे अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवण्याची गरज आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला होता.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही असं म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना उत्तर प्रत्युत्तर दिलंय.
बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली.
बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं 'नागरिकत्व दुरूस्ती विधेयक' मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती. भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रध्दा,प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले.
राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका तसेच कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा काँग्रेस नेते उद्दामपणा करतानाही तुम्ही अवाक्षर काढले नाही. यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते. तुम्हाला विश्वगुरू पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच पण तुमची ती लायकी देखील नाही.
बांगलादेशातील हिंसाचारविरोधात कठोर भूमिका घ्यावी यासाठी ठाकरे सेनेच्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींना निवदेन पत्र देणार होते. त्यासाठी ठाकरे सेनेचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार होते. मात्र पंतप्रधान मोदींनी भेटीची वेळ दिली नाही. त्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदींना कोपरखळी मारली. आमच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना ती नाकारण्यात आली. मी सांगितलं होतं की, रितसर जाऊन पंतप्रधान मोदींना पत्र द्यावं. कारण त्यांच्यामागे खूप व्याप आहे.
जगभरात फिरायचं असतं, भाषणं द्यायची असतात. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांच्या लक्षात आले नसावेत. मणिपूरचे अन्याय कळले नाहीत तसेच हिंदूंवरचे अत्याचार कळले नसतील. त्यामुळे केंद्र सरकारने आपली भूमिका काय आहे ते स्पष्ट केलं पाहिजे. शेख हसीना येथे आल्या त्या सुरक्षित आहेत. मात्र बांगलादेशातील गोरगरिब हिंदूंचं काय?
बांगलादेशातील इस्कॉनचं मंदिर जाळलं तर सिडकोचा डोळा मंदिराच्या जागेवर अशी बातमी आपण वाचल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. हा भूखंड एकालाच जाणार आहे. दुसरीकडे दादर येथील हनुमानाच्या मंदिराला भाजपाने नोटीस पाठवलीय. ८० वर्षांपूर्वींचं मंदिर पाडायला निघालेत. आता यांचं हिंदुत्व कुठे आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.