

बिल्डरने भिंत बांधून नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह बदलला
कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली जाण्याची भीती
तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना बिल्डरकडून दमदाटीचा आरोप
वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील धक्कादायक प्रकार
वांगणीत एका खासगी बिल्डरने भिंत बांधून नैसर्गिक ओढ्याचा प्रवाहच बदलला आहे. बिल्डरच्या या अवैध बांधकामामुळे पावसाळ्यात कर्जत-कल्याण राज्य महामार्ग पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर ओढ्यालगतच्या शेतांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. या अवैध कामाला विरोध करणाऱ्यांना बिल्डरने धमकी दिल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
वांगणीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्जत-कल्याण राज्य महामार्गालगत एका बिल्डरने खासगी गृहनिर्माण प्रकल्पाचं काम सुरू केलं आहे. हे काम करत असताना बिल्डरने नैसर्गिक ओढ्यात १०० मीटरहून जास्त लांबीची क्राँकिट भिंत बांधत हा ओढा अरूंद केला आहे. इतकेच नाही तर पुढच्या भागात या ओढ्यावर बंधाऱ्यासारखी भिंत बांधून ओढ्याचा प्रवाहदेखील बदलण्यात आला आहे.
पावसाळ्यात हा ओढा दुथडी वाहत असतो. त्यामुळे वांगणी गाव रस्त्यासह, कर्जत-कल्याण राज्य महामार्गावर पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे या ओढ्यालगत स्थानिकांची शेतजमीनही आहे. बिल्डरने ओढा अरूंद केल्यामुळे आता हे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसून नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष देऊन संबंधित भिंत तोडावी आणि दादागिरी करणाऱ्या बिल्डरवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली.
हा नैसर्गिक ओढा आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जोरदार असतो. याच ओढ्यावर बिल्डरने अनधिकृत बांधकाम केलं आहे. त्याची जागा निघत असली तरी, पण नैसर्गिक ओढ्याचं पाणी वाहून जाण्यासाठी त्यानं जागा सोडलेली नाही. यात माझ्या शेतीचं पूर्ण नुकसान होण्याची भीती आहे. पावसाळ्यात राज्यमार्गावर पाणी साचून वाहतूक बंद होऊ शकतो.
- एकनाथ भोईर, स्थानिक शेतकरी
गेल्या काही दिवसांत वांगणीत अनधिकृत चाळ बांधकामांचं प्रमाण वाढलं आहे. अलीकडेच तहसीलदार अमित पुरी यांनी वांगणीचा दौरा करत या अनधिकृत बांधकामांबाबत आढावा घेतला होता. त्यात आता एका खासगी विकासकानेच नैसर्गिक ओढ्यात भिंत बांधून पाण्याचा प्रवाह बदलल्याने वांगणीत शासकीय नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी, तहसीलदारांसह शासकीय यंत्रणा कडक भूमिका घेतात का? की बिल्डरला क्लीन चिट देऊन शासकीय नियमच पायदळी तुडवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.