संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईसारख्या महानगरात मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर तो पुन्हा मिळणे अत्यंत कठीण मानले जाते. त्यामुळे अनेक नागरिक मोबाईल परत मिळण्याबाबत साशंक असतात. मात्र बोरिवली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल 130 मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले. यामुळे मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला, तर बोरिवली पोलिसांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
मोबाईल वितरण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, मोबाईल किंवा इतर मौल्यवान वस्तू हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास वेळ न दवडता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच नागरिकांना ऑनलाइन पोर्टलद्वारेही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, परिसरात कोणी अत्यंत कमी किंमतीत किंवा संशयास्पद पद्धतीने मोबाईल अथवा इतर वस्तू विक्रीस काढत असल्यास लालसेपोटी त्या वस्तू खरेदी करू नयेत. अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आश्वासनही पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांनी दिले. बोरिवली पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून, हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रभावी प्रयत्न केले जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.