मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका करत आता लाडकी मेहुणा योजना आणतील, असं म्हटलं होतं. यालाच आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''जरांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटतेय. गोरगरीब महिलांना, भाऊ-बहिणींना फायदा होतोय. त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे, म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी केल्याचा फुटकळ आरोप ते करत आहेत.''
ते म्हणाले, ''या योजनेतून मराठा समाजातील गरीब महिलांनाही मदत होणार आहे. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपेक्षित, वंचित सर्व गरीब घटकांना न्याय मिळणारी ही योजना आहे. पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात सर्व खड्ड्यात गेले, रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगे यांनी बाहेर यायला हवं.''
प्रवीण दरेकर म्हणाले, ''माझ्याबाबतीत, प्रसाद लाड यांच्याबाबत बोललात. जरांगे तुम्हाला मराठा समाजाने गर्दी केली म्हणून पोपटपंची करताहेत. आम्ही गेले १५-२० वर्ष प्रत्यक्ष काम करतोय. पडद्याच्या मागे आम्ही काय करतोय हे सर्व मराठा संघटनांना विचारा. मुलांच्या परीक्षेचा, भरतीचा प्रश्न, पदोन्नती, अधिसंख्या यासाठी प्रविण दरेकरांनी पुढाकार घेतला आहे. तुम्हाला माहित नाही. जरा माहिती घेऊन बोलत जा. जेव्हा पीएसआय मुलांचा प्रश्न होता तेव्हा ६००-७०० पीएसना देवेंद्र फडणवीसांकडे नेऊन मी जॉईंट करविले आहे. आपले अज्ञान आहे.''
दरेकर पुढे म्हणाले, ''जरांगे तुम्हाला कल्पना नसेल मराठा समाजातील मुलांच्या नोकऱ्यांसाठी, स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत. मराठा समाजाला भावनिक करून मलाच नेता बनायचे आहे, तुम्ही तुमची वक्तव्ये तपासा.''
ते म्हणाले, ''तुमचा भंपकपणा आम्ही आता उघडा करणार आहोत. मी मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे. गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवेय ते द्यायचेय. कारण जरांगेंवर प्रेम केले, पाठबळ दिले पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचे भूत बसलेय ते उतरवावे लागेल ते आम्ही निश्चितपणे करू. त्याचे अभियान सुरू करू.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.