भरत मोहोळकर , साम टीव्ही, प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर योजनांसाठी पैशांचं नियोजन करताना वित्त विभागाची तारांबळ उडालीय. दरम्यान 6 हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीचा प्रस्ताव तब्बल 8 हजार कोटींनी वाढवून 36 हजार कोटींचा करण्यात आला. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशीच पंगा घेतला आणि त्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत वादाची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊ...
रस्ते बांधणीचा प्रस्ताव 8 हजार कोटींनी वाढवला आहे. प्रस्ताव ऐनवेळी आल्याने अजित पवारांची नाराजी व्यक्त केली आहे. प्रस्तावाच्या अभ्यासाशिवाय सही कशी करणार? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. प्रस्तावाच्या विरोधात वित्त विभागाची नोटही समोर आली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह करण्यात आल्याचं, सूत्रांनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील वादावर संजय राऊतांनीही तोंडसुख घेतलंय, तर अजित पवारांनी वादाचं वृत्त फेटाळून लावलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, हे हे तीन गँगमधील गँगवॉर आहे. तर अजित पवार म्हणाले आहेत की, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत.
महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांच्या निधीला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांच्या कामांच्या फाईल्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रोखल्याने दादांच्या राष्ट्रवादीत खदखद असल्याची चर्चा रंगलीय.
दुसरीकडे अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या आणि आरोग्य खात्याच्या विवादीत अॅम्ब्युलन्स कंत्राटाची फाईल्सही रोखल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर निधीवरून महायुतीतील खदखद समोर आलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.