
अंबरनाथमध्ये (Ambernath) एक धक्कादायक घटना घडली आहे. खासगी स्कुल व्हॅन्सकडून आरटीओची कोणतीही परवानगी नसतानाही अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याची बाब समोर आलीये. शहरातल्या अनेक शाळांमध्ये खुलेआमपणे हा प्रकार सुरू असून एकेका इको व्हॅनमध्ये २०-२० विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबड्यांसारखं कोंबून नेलं जात आहे.
असं असतानाही आरटीओ, वाहतूक पोलीस आणि शाळा प्रशासनाकडून या प्रकाराकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातंय. यावर कारवाई करण्याची मागणी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.
अंबरनाथ शहरात अनेक खासगी शाळा असून काही शाळांच्या स्वतःच्या बसेस आहेत. ज्या शासकीय नियमांची पूर्तता करत असल्याचं पाहायला मिळतं. तर काही शाळांमध्ये खासगी इको व्हॅन, टेम्पो ट्रॅव्हलर, रिक्षा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ने आण केली जाते.
मात्र ही वाहतूक करण्यासाठी आरटीओ आणि शाळेची परवानगी आवश्यक असते. तसंच विद्यार्थी सुरक्षा कायदा आणि शासनाच्या नियमांची पूर्तता करणंही आवश्यक असतं. मात्र हे नियम धाब्यावर बसवून अनेक शाळांमध्ये खासगी इको व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने आण केली जाते.
यासाठी खासगी व्हॅन मालकांनी इको गाडीच्या रचनेत बदल करून सीएनजी सिलेंडरच्या वर देखील सीट बसवल्या असून सीएनजी सिलेंडरवर ८ विद्यार्थ्यांना बसवलं जातं, तर एका इको गाडीत तब्बल २० विद्यार्थ्यांना कोंबलं जातं.
अशात जर एखादा अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळं अपघात झाल्यानंतर नियम लादण्यापेक्षा आधीच या अवैध विद्यार्थी वाहतुकीवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.