''राज ठाकरे रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे, त्यांनी करावं आत्मपरिक्षण''

राज ठाकरेंनी काल आपल्या भाषणातून बंधू उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरतीही निशाणा साधला होता.
राज ठाकरे
राज ठाकरे- Saam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुडीपाडवा मेळाव्यात शरद पवारांवरती जोरदार टीका केली होती. १९९९ ला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) जन्म झाला तेव्हापासून राज्यात जातीपातीमध्ये भांडणं लावण्याचे काम सुरु झाले अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. आता त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. राज ठाकरेंना टीकेशिवाय आणि नकलांशिवाय काही जमलं नाही. राज ठाकरे हे नेहमी पलटी मारतात. सरड्यासारखे रंग बदलण्याचे काम करतात. राज यांनी आत्मपरिक्षण करावे. एकेकाळी पवारांचं कौतुक केलं आता जातीयवादी वाटायला लागले असे म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. कालच्या भाषणात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अजित पवार यांची मिमिक्री देखील केली होती.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की राज ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं की एकेकाळी आपले 14 आमदार निवडून आलेले. तेच आमदार आपल्याला सोडून का गेले? नुसते भाषण करून जनतेचे प्रश्न सुटत नाही किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. ते इतके पलटी मारतात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी आताच्या केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर विधानसभेचे काळात सुद्धा त्यांनी काय केलं हे आपण पाहिलं आणि आता कालच्या सभेत काय केलं तेही पाहिलं.

दरम्यान राज ठाकरेंनी काल आपल्या भाषणातून बंधू उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरतीही निशाणा साधला होता. राज्यातील जनतेने युतीला मतदान केले होते आघाडीला नाही असे स्पष्ट शब्दात राज ठाकरे काल म्हणाले. यावरुन राज ठाकरेंची स्क्रिप्ट ही भाजपाकडून आली होती. राज ठाकरे म्हणजे भाजपाचा भोंगा अशी टीकाही सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंची मशिदीबाहेरच्या भोंग्यांसंदर्भातील भूमिका ही आणि भाजपाची भूमिका जशास तशी आहे म्हणूनही राज ठाकरेंवरती टीका केली जात आहे.

राज ठाकरेंनी कालच्या भाषणात महाविकास आघाडी सरकारवरती चांगलीच आगपाखड केली. राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईलाही राज ठाकरेंनी सत्तेशी जोडले आहे. तुम्हाला सत्ता हवी होती आता भोगा असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com