

Mumbai News: मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) तब्बल 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कुलगुरु (Vice Chancellor) मिळाले आहेत. प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी (Ravindra Kulkarni) यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु पदी निवड करण्यात आली आहे. ८ जून म्हणजे आज रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. विद्यापीठाचे मावळते प्रभारी कुलगुरू प्राध्यापक दिगंबर शिर्के यांनी रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे कार्यभार सोपवला.
मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि मुंबईमधील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आज निवड करण्यात आली. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मावळते कुलगुरू दिगंबर शिर्के यांचा निरोप समारंभ आणि नवनियुक्त कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचा स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यापीठाचे माजी प्रभारी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती होते.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ मागच्या वर्षी १० सप्टेंबरला संपुष्टात आला होता. त्यानंतर मुंबई विद्यापीठासाठी लवकरात लवकर नवीन कुलगुरुंची निवड होणे गरजेचे होते. पण मुंबई विद्यापीठाला नवीन कुलगुरु मिळण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागला. तोपर्यंत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक दिंगबर शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर आता अखेर आज मुंबई विद्यापीठाला पूर्णवेल कुलुगुरु मिळाले. राज्यपाल बैस यांनी मंगळवारी रवींद्र कुलकर्णी यांची कुलगुरु पदी निवड केली. त्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला.
रवींद्र कुलकर्णी यांनी कुलगुरु पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सांगितले की, 'मुंबई विद्यापीठाला ज्ञानदानाची उज्वल, ऐतिहासिक आणि समृद्ध परंपरा लाभली आहे. मागील अनेक वर्षांपासून विद्यापीठाने ज्ञानदानाचा हा वारसा अविरतपणे जोपासला आहे. ही प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.'
तसंच, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे संपूर्ण शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल घडून येणार आहेत. लवचिकता ही या धोरणाची सर्वात जमेची बाजू असल्याने अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या बदलाना समर्थपणे समोरे जाणे ही आपली प्राथमिकता असून त्या दिशेने सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमांची रचना, श्रेयांक पद्धती, एकेडेमिक बँक ऑफ क्रेडीट, मल्टी इन्स्टीट्यूशनल लर्निंग, टिचींग, लर्निंग आणि एव्हॅल्यूशन यामध्येही मोठे बदल दिसून येणार आहेत.' असे त्यांनी सांगितले.
रवींद्र कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, मुंबई विद्यापीठाला नॅकची सर्वोच्च श्रेणी प्राप्त झाल्यामुळे मुंबई विद्यापीठाला परदेशी विद्यापीठांसोबत शैक्षणिक सामंजस्य करार करणे अधिक सुलभ झाले असून नजीकच्या काळात त्या दृष्टिने पावले टाकली जाणार आहेत.' यावेळी मावळते प्रभारी कुलगुरू दिगंबर शिर्के यांनी मागील ९ महिने विद्यापीठात विविध भागधारकांच्या सहकार्याने केलेल्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले. तर प्रभारी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉक्टर अजय भामरे यांनी विद्यापीठात सेवेची संधी मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.