मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वत्र राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धुरळा उडवला आहे. या प्रचारसभेत राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. याचदरम्यान, आदित्य ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरत असताना शिंदे गटातील एका बड्या मंत्र्याचा फोन आला होता. त्यांनी ८ आमदार बंडाच्या तयारीत असल्याचं सांगितलं, असा दावा आदित्य ठाकरे यांनी वृत्तपत्राला मुलाखत देताना केला.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील एक मंत्री आणि ८ आमदार ठाकरे गटात येणार होते, असा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणे सुरु असताना शिंदे गटातील एका बड्या मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्यासह ८ आमदार बंड करत आहे. उद्धव ठाकरेंची माफी मागून पुन्हा पक्षात येतो, असं त्यांनी सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. मात्र, आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं आदित्य ठाकरेंनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.
'एका मंत्र्यांसह ८ आमदार पुन्हा पक्षात येणार होते, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. तो मंत्री कोण, ते एकूण आठ आमदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावरही जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, 'अनेक जण पक्ष बदलत आहेत. विचारधार बदलत आहेत. पण या लोकांनी थेट पक्ष फोडला. पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं. ते आजही माझ्या आजोबांचे फोटो वापरतात. माझ्या बाबांनी त्यांचे फोटो काढले आहेत'.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीतही मोठा गौप्यस्फोट केला होता. फुटीदरम्यान सूरतला गेल्यानंतर एकनाथ शिंदे माघारी फिरण्यास तयार होते. पण माघारी आल्यानंतर मला मारून टाकतील, असं त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे आदित्य यांना सांगितलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.