
आजच्या स्वार्थी जगात प्रत्येक गोष्टीला किंमत असते. मात्र सुधागड तालुक्यातील खेमवाडीत राहणाऱ्या भगवान धोंडू खताळ यांचे वारस झोरे कुटुंबीयांनी हे म्हणणे खोटे ठरवले आहे. या कुटुंबाने आपल्या पूर्वजांचे राहते घर सार्वजनिक मंडळाला दान केले आहे.
खेमवाडी-ताडगाव गावात अनेक वर्षांपासून मोठं समाजमंदिर नव्हतं. त्यामुळे गावातील नवरात्र उत्सव, पूजा किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जागेची मोठी अडचण निर्माण व्हायची. तरुणांना प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी जागा शोधण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर गावाच्या मध्यभागी राहत असलेले भगवान खताळ यांचे घर समाजकार्यासाठी मंडळाला मिळावे अशी मागणी करण्यात आली होती.
ही मागणी मान्य करत वारसदार सुरेश झिमा झोरे, आकाश हरिश्चंद्र झोरे, अविनाश झोरे, अक्षय झोरे आणि आदित्य झोरे यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता मोठ्या मनाने घर दान केले. त्यांनी केलेल्या या दानकार्यामुळे खेमवाडीला हक्काची जागा मिळाली असून गावातील धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम आता सुलभपणे आयोजित करता येणार आहेत.
या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेमजाई नवतरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी झोरे कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. गावाच्या सामाजिक बांधिलकीचा हा आदर्श नमुना ठरला असून तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. खेमजाई नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष कैलास खताळ, खजिनदार बाळासाहेब धायगुडे, सचिव मंगेश खताळ, उपसचिव भगवान झोरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य अनंत धायगुडे, उमेश खताळ आदींनी या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
बाळासाहेब धायगुडे म्हणाले, ''आजकाल पाणी सुद्धा कोणी फुकट देत नाही. पण आपल्या पूर्वजांचे राहते घर समाजासाठी दान करणे हीच खरी सेवा आहे. याचा आदर्श तरुणांनी घ्यायला हवा.''
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.