संजय राठोड
यवतमाळ - किटा जंगलात शिकाऱ्यांनी भाल्याने भोसकून वाघाचा शिकार केली आहे. त्यानंतर त्याचे अवयव विक्रीसाठी नागपूर येथे घेवून जात असताना हळदगाव टोलनाक्यावर सहा जणांना वन विभागाच्या बुटीबोरी पथकाने अटक केली. त्यांच्या कडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर हे पथक यवतमाळात दाखल झाले. त्यांना किटा येथील एका घरातून वाघाचे अवयव जप्त केले. तेच कनेक्शन पकडून वनविभागाच्या पथकाने पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वन्यप्राण्याची हाडे,नखे तसेच आदी अवयव जप्त करण्यात आले आहे. उमरेड,रामटेक व यवतमाळ येथील वनविभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
हे देखील पहा -
विनोद देवकर, प्रदिप बोरकर, संतोष कुंभेकर, जगदीश डुकरे, लक्ष्मण कवाने अशी संशयितांची नावे आहे. नागपूर-वर्धा मार्गावर असलेल्या हळदगाव टोलनाक्यावर सापळा रचून वाघांच्या अवयवाची तस्करी करणार्या टोळीला ११ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. यात यवतमाळ जिल्ह्यातील दोन आरोपी वनविभागाच्या हाती लागले होते. त्यामुळे व्याघ्र तस्करीशी यवतमाळ कनेक्शन असल्याचा संशय होता. तोच धागा पकडून नागपूर व यवतमाळच्या पथकाने काल पहाटेच्या अंधारात किटा गावात धडक दिली.
संशयित साखर झोपेत असताना त्यांना ताब्यात घेतले. वनविभागाचा फौजफाटा बघून गावात एकच खळबळ उडाली होती. यवतमाळ वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४६९ किटा बीट वाघापूर राऊंडमध्ये २ वर्षांपूर्वी वन्यजीवाचा सांगाडा आढळून आला होता. काही जणांनी त्यांना मिळेल ते अवयव घेऊन आपापले घर गाठले होते. किटा येथील एका संशयिताच्या हाती काही अवयव लागले आणि तो यापूर्वीच जाळ्यात अडकला होता. नागपूर वनविभागाच्या पथकाने पाचही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून नखे व हाडे जप्त करण्यात आली आहे. घटना जुणी असल्याने वन्यप्राण्याचा मृत्यू कसा झाला, हे सांगता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.