- चेतन व्यास
घराजवळ पतंग उडवत असलेल्या बारा वर्षीय बालकाला शेजाऱ्याने विहिरीवर नेत नरबळी देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वर्धेच्या नलवाडी परिसरात घडला पण बालकाने समयसूचकता दाखवत विहिरीत असलेल्या पाट्याला पकडत हिंमतीने तो विहिरीच्या बाहेर आल्याने त्याचे प्राण वाचले. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी सखोल चौकशी करत नरबळी व इतर अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 अन्वये एका महिलेवर गुन्हा नाेंदविला आहे. (Maharashtra News)
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार वर्धा येथील नलवाडी परिसरातील नागसेन नगर येथील सर्वेश पुरषोत्तम गाटेकर हा बारा वर्षीय चिमुकला मागील दोन वर्षांपासून आपल्या मामा व आजीसोबत वर्धेत राहतो. सर्वेश घराजवळ पतंग उडवत असतांना घरासमोरीलच शारदा वरके या महिलेने त्याला काम पाहण्याच्या बहाण्याने नागसेन नगर येथील रोडच्या बाजूला असलेल्या विहिरी जवळ नेले.
या ठिकाणी महिलेने बालकाला विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. त्यानंतर विहिरीत फुल टाकायला लावले. तसेच पाच दगडं विहिरीत टाकायला सांगितली. पाचवा दगड विहिरीत टाकताच महिलेने सर्वेशला विहिरीत ढकलले. त्यानंतर ती तेथून निघून गेली.
सर्वेशचे धाडस
दरम्यान महिलेने सर्वेशला ज्या विहिरीत ढकलले होते ती विहीर 40 फूट खोल आहे. त्यात 26 फूट पाणी होते. सर्वेशने विहिरीत पडताच समयसूचकता दाखवत विहिरीत मोटार लावण्यासाठी असलेल्या जुन्या पाट्याला पकडले. त्या पाट्याचा आधार घेत ताे विहिरीच्या बाहेर सुखरूप आला. त्याला काही अंतरावरच ती महिला जाताना दिसली परंतु घाबरलेल्या सर्वेशने तडक घर गाठले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महिलेवर गुन्हा दाखल
आपल्याबाबत घडलेला प्रकार त्याने मामी व आजीला कथन केला. सर्वेशच्या कुटुंबियांना प्रथम धक्काच बसला. त्यांनी वर्धा शहर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करीत सर्वेशने सांगितलेल्या प्रकारावरुन महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला अशी माहिती धनाजी जळक (पोलीस निरीक्षक, वर्धा) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.
अंधश्रधेला बळी पडू नका
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आला आहे. पण या कायद्याचा पाहिजे तेवढा प्रसार आणि प्रचार झाला नाही. यामुळे आजही काही नागरिक अंधश्रधेला बळी पडून असे कृत्य करत आहेत. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्र सुरकार यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.