Sandeep Deshpande on Shivsena : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीशी संबंधित एक व्हिडिओ शेअर करत मोठा खळबळ उडवून दिली. या व्हिडिओवर भाष्य करताना त्यांनी एका नेत्याने शाखाप्रमुखाला ५० लाख रुपये दिल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
व्हिडिओ आणि संदीप देशपांडे यांचा आरोप
संदीप देशपांडे यांनी सांगितले की, त्यांनी ट्विट केलेला व्हिडिओ मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळातील असून तो स्वयंसपष्ट आहे. त्यामध्ये दिसणारे शाखाप्रमुख संतोष पवार स्वतःचे नाव आणि शाखा सांगत असून, त्यांना एका वरिष्ठ नेत्याने ५० लाख रुपये दिल्याचे आणि त्या रकमेचा व्हिडिओ त्यात दाखवण्यात आल्याचे देशपांडे म्हणाले. हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे एआय-जनरेटेड वाटत नाही, त्यामुळे संतोष पवार यांनीच याचे उत्तर दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या नेत्याने ही रक्कम दिली, त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रभाग २२६ मधील निवडणुकीचा संदर्भ
हा प्रकार प्रभाग क्रमांक २२६ मधील शाखाप्रमुखाशी संबंधित असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. त्यावेळी मकरंद नार्वेकर आणि तेजल पवार यांच्यात लढत झाली होती. मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांचा अर्ज बाद झाल्याचे आणि युतीमुळे शिवसेनेने (उबाठा) उमेदवार दिला नव्हता. पण निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आधीच पैसे दिले होते की निवडणुकीनंतर काम करू नये म्हणून पैसे दिले होते, याचा खुलासा संतोष पवार यांनी करावा, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने चौकशी करावी
निवडणुकीत पैशांची देवाणघेवाण होणे नवीन नसले तरी, अशा पद्धतीने नोटांची बंडले दाखवणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असे देशपांडे म्हणाले. हा व्हिडिओ तब्बल जवळपास एक वर्षानंतर (जानेवारीत झालेल्या निवडणुकांनंतर) आता का समोर आला, यावरही त्यांनी भाष्य केले. निष्पक्ष निवडणुका पार पडतात की नाही आणि आर्थिक व्यवहार होतात का, हे पाहण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याने सरकारसोबतच निवडणूक आयोगानेही या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.