हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. लातूर, वर्धा, धाराशिव, परभणी, नंदुरबार तसेच इतर भागात सध्या जोरदार पाऊस झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील वायफड गावात रविवारी पहाटे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे जमिनी खरडून गेल्या असून शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
वर्धा जिल्ह्यातील वायफड गावात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून नद्या नाल्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे गावातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं असून नागरिकही भयभीत झाले आहेत. हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एक ते दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीपातील पिके धोक्यात आली होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अनेक भागात रिमझिम पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी सुखावला आहे.
लातूर जिल्ह्यात शनिवारपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून सूर्यदर्शन झालेलं नाही. आ जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाने हजेरी देखील लावली. औसा तालुक्यातील उजनी परिसराला काल सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले आहे. पावसामुळे उजनी, एकंबी तांडा उजनी-मासुर्डी या गावांना जोडणारा रस्ता ओढ्याला पूर आल्याने काही काळ बंद झाला होता.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात शनिवारी राञी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे झाल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावून गेला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिला होता. शनिवारी सकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. कंधार, लोहा हदगाव, हिमायतनगर नांदेड या तालुक्यातील अनेक भागात पाऊस बरसला. पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पाऊस पुनरागमन करेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.