
हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाच्या कार्यपद्धतीवर विशेष बैठक आयोजित करण्यात आली. मात्र, या बैठकीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील माजी सदस्यांना डावलल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
अकोल्याच्या डॉ. आशा मिरगे, नागपूरच्या आभा पांडे, निता ठाकरे, तसेच चंद्रपूरच्या डॉ. विजया बांगडे या चौघींनी अलिकडच्या काळात महाराष्ट्र राज्य महिला आयोगावर सदस्य म्हणून काम केलं आहे. मात्र, या चारही महिलांना आजच्या बैठकीसाठी कोणतंही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
फक्त विदर्भ नव्हे, तर मराठवाड्यातील माजी सदस्य आणि महिला कार्यकर्त्यांनाही या चर्चासत्राबाबत निमंत्रित करण्यात आलं नाही. यामुळे संपूर्ण मराठवाड्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.
या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. कारण, डॉ. आशा मिरगे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, आभा पांडे या अजित पवार गटात, डॉ. विजया बांगडे या काँग्रेसमध्ये, तर निता ठाकरे या भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्याउलट, वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. उत्कर्षा रूपवते यांना मात्र बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
डॉ. मिरगे यांचा संतप्त सवाल
या पार्श्वभूमीवर, डॉ. आशा मिरगे यांनी थेट डॉ. नीलम गोऱ्हे यांना सवाल करत विचारलं आहे की, “विदर्भ आणि मराठवाड्यातील महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण अधिक असताना, या भागांतील अनुभवी सदस्यांना बैठकीतून डावलण्याचं कारण काय आहे?”. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
मविआच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांची घेणार भेट
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला असुरक्षेचा मुद्दा चांगलाच पेटला असून, राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मात्र दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज दुपारी १२ वाजता राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहिणी खडसे आणि खासदार वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.