Maharashtra unseasonal rain Lightning : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे अस्मानी संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. सोमवारपासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची सुरूवात झाली आहे. आज आणि उद्याही राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज सांगितलाय. राज्यावर आलेल्या अस्मानी संकटात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अंगावर वीज पडून आतापर्यंत राज्यात सहा जणांचा मृत्यू झालाय. शहापूर, नाशिक, अहमदनगर आणि जालन्यामध्ये वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
शहापूर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. डोळखांब परिसरातील जांभुळवाड येथील दिनेश नारायण सोगीर (वय ३०), नयन भगवान सोगीर (वय १४) आणि काळूराम सखाराम वाघ हे तिघे दुचाकीवरून घरी परतत असताना चिल्लरवाडी येथे त्यांच्यावर वीज कोसळली. यात दिनेश आणि नयन यांचा जागीच मृत्यू झाला, तर काळूराम गंभीर जखमी झाला. जखमी काळूरामला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जालन्यात अंगावर वीज पडून एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. जालन्यातील भाटेपूरी गावातील ही घटना आहे. विठ्ठल कावळे वय २२ वर्ष अस मयत तरुणाच नाव आहे. वीज तरुणाच्या अंगावर कोसळल्यानंतर तरुणाला जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत, मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. सोमवारी जालना जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. जालन्यातील भाटेपुरी गावातील या तरुणाचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.
इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे अवकाळी पावसादरम्यान वीज पडून पुजा त्र्यंबक भांगरे (वय २४) या युवतीचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. पुजा घराजवळच्या शेतात काम करत होती आणि अंगणात वाळत घातलेल्या पापड्या व कुरडया काढत असताना अचानक तिच्यावर वीज कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
बुलढाण्यातील लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात चोरपांग्रा येथील रंजना संदीप चव्हाण (वय ३५) या महिलेच्या अंगावर शेतात काम करताना अचानक वीज कोसळली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रंजनाच्या बाजूलाच असलेली दोन मुले सुदैवाने बचावली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. महिलेचा मृतदेह बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे काल, १२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. याचवेळी शेतात काम करणाऱ्या गणेश शिवाजी काळे (वय ३४) या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर अचानक वीज कोसळली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.