उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदारासह जिल्हाप्रमुख अन् तालुकाप्रमुखांचा 'जय महाराष्ट्र'; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Kalmanuri Assembly Election : हिंगोलीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षांतर केल्याची माहिती आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv
Published On: 

Santosh Tarfe joins Eknath Shinde Shiv Sena : हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यातील आदिवासी समाजाचे नेते आणि माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. डॉ. टारफे यांच्यासोबत जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षांतर केले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात डॉ. संतोष टारफे यांनी निवडणूक लढवली होती. या लढतीत त्यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी तब्बल ९१ हजार मते घेतली होती.

या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात ठाकरे गटाच्या संघटनात्मक रचनेला धक्का बसला असून, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत माजी आमदारांसह जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी लवकरच हिंगोलीत मोठा मेळावा आयोजित करण्याचे आवाहन करत, आपण स्वतः या मेळाव्याला उपस्थित राहू, असेही सांगितले. पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Uddhav Thackeray
Pune : पुणे पोलीस दलात खळबळ!पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर कर्मचाऱ्याचा गोंधळ; बदल्यांवरून नाराजीचा मुद्दा ऐरणीवर

डॉ. संतोष टारफे यांच्या प्रवेशामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांसह अनेक महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हाप्रमुख गोपी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल आणि अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शाखाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. कळमनुरीचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत भर पडली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करताना, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांची शिवसेना ही सर्वसामान्यांच्या आणि समाजाच्या विकासासाठी काम करणारी संघटना असल्याचे सांगितले. डॉ. संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे नेतृत्व करत असून, त्यांच्या माध्यमातून या समाजाच्या उन्नतीसाठी अधिक व्यापक काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

"तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत आला आहात. समाजाचे काम करा, शिवसेनेचे काम करा. तुमच्या विकासकामांसाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी शिवसेना कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. तुम्हाला कोणतीही कमतरता भासू देणार नाही," अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.

हिंगोली जिल्ह्यातील विकासकामांचा संदर्भ देताना शिंदे यांनी आमदार संतोष बांगर यांच्या माध्यमातून यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. यापुढेही या भागातील अपूर्ण विकासकामे, आवश्यक पायाभूत सुविधा आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केवळ पक्षसंघटनाच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.