

मनसे-ठाकरे गट युती चर्चेदरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रमुख राजू वैद्य यांचा राजीनामा
ऐन महापालिका निवडणुकीत पक्षफुटीमुळे राजकारण तापलं
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मनसे आणि ठाकरे गटाने तयारी सुरू केलीय. मातोश्रीवर मनसे आणि आणि ठाकरे गटात जागा वाटपांबाबत चर्चा सुरू आहे. एकीकडे युतीवर शिक्कामोर्तब होत असताना मराठावाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे महानगर प्रमुख रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केलाय.
ऐन निवडणुकीच्या काळात राजू वैद्य यांनी राजीनामा दिल्यानं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा झटका बसलाय. राजू वैद्य हे यापूर्वी छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली होती. महापालिकेत अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील पहिल्या फळीतील जवळपास सगळे नेते शिंदे सेनेत गेलेत. आता राजू वैद्य हेही उद्या किंवा परवा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या नावे पत्र लिहित राजू वैद्य यांनी आपला राजीनामा दिलाय.
मी छत्रपती संभाजीनगर येथील महानगर प्रमुख म्हणून कार्यरत होतो. माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी पक्षपदाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत तुम्ही व सर्व शिवसैनिकांनी वेगवेगळ्या विषयामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. शिवसेनेत फूट पडल्यापासून छत्रपतीसंभाजी नगर शहरात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह माजी महापौर, नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत.
दीड वर्षात मोठ्या प्रमाणात पदाधिकारी शिंदे सेना आणि भाजपमध्ये दाखल झालेत. त्यामुळे ठाकरे सेनेत अस्थिरतेचं वातावरण आहे. त्यात आता राजू वैद्य यांचा राजीनाम्यामुळे पक्षात अजून खळबळ माजली आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशात पक्षातून होणारी आऊट गोईंग रोखण्यास अंबादास दानवे आणि शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरेंना यश येत नाहीये.
तीन दिवसांआधीच दोन माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केलाय. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेगमपुराचे माजी नगरसेवक विनायक पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर शनिवारी पूर्व आणि फुलंब्री मतदारसंघातील ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक आशा नरेश भालेराव तसेच मनोज गांगवे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या दीड वर्षांत ठाकरे सेनेचे ५ माजी नगरसेवक भाजपच्या तर २३ नगरसेवक शिंदेसेनेच्या गळाला लागलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.