राजेश काटकर, परभणी
Parbhani News: परभणीमध्ये (Parbhani) दोन सख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वेगवेगळ्या घटनेत त्यांच्या मृत्यू झाला आहे. एकाचा नदीमध्ये बुडून तर दुसऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परभणीच्या (Parbhani Crime News) आरखेड गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या पालम तालुक्यातील आरखेड गावामध्ये ही घटना घडली आहे. राजकुमार दुधाटे (28 वर्षे) आणि नितीन दुधाटे (25 वर्षे) या दोन सख्ख्या भावांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. घरातील कर्त्या व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे दुधाटे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावच रडले.
28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शेतातील काम उरकून आल्यानंतर राजकुमार तुकाराम दुधाटे हा गोदावरी नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडला. 3 दिवस शोध घेतल्यानंतर 30 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता राजकुमारचा मृतदेह सापडला. त्याच्या मृतदेहावर दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुःखातून दुधाटे कुटुंब सावरत नाही तोवर राजकुमारचा छोटा आणि सख्खा चुलत भाऊ नितीन मारोतराव दुधाटे याचा अपघात झाला. 1 मे रोजी रात्री 10 च्या सुमारास पालम ते लोह या राष्ट्रीय मार्गावर त्याचा अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत नितीनचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनेने दुधाटे कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोन सख्या चुलत भावाचा दोन दिवसांत असा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून चार दिवसांपासून गावात चूल पेटली नाही. दोघेही कुटुंबातील कर्ते प्रमुख आणि एकुलते एक होते. हा अपघात पचविणे सर्वानाच अवघड जात आहे. आज दुपारी गोदाकाठावर स्मशानभूमीत नितीन दुधाटेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.