
अमरावतीतील १० वर्षीय मुलीच्या पोटातून अर्धा किलो केस काढण्यात आले.
मुलीला सतत पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास होता.
अनेक तपासण्यांनंतरही निदान चुकले, उपचार प्रभावी नव्हते.
अमरावती जिल्ह्यातील एका दहा वर्षीय मुलीच्या पोटातून तब्बल अर्धा किलो केसांचा गोळा शस्त्रक्रियेतून बाहेर काढण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मळमळ, उलट्या आणि अन्नपचनाच्या तक्रारींमुळे त्रस्त असलेल्या या मुलीवर अमरावतीमधील बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. उषा गजभिये यांनी यशस्वी उपचार केले.
ग्रामीण भागातील १० वर्षीय तृप्ती (नाव बदललेलं) या मुलीला काही तक्रारी जाणवत होत्या. यामध्ये त्या मुलीला सतत पोटात वेदना, जळजळ, मळमळ आणि उलट्या यांचा त्रास होत होता. पालकांनी तिला अनेक डॉक्टरांकडे नेलं. सोनोग्राफी, एक्स-रे यांसारख्या तपासण्याही केल्या. काही डॉक्टरांनी ऍसिडिटीचे निदान करत औषधोपचार सुरू केलं. मात्र त्रास काही कमी झाला नाही.
शेवटी मुलीच्या डॉ. उषा गजभिये यांनी तृप्तीशी थेट संवाद साधला. यावेळी तिच्याशी बोलण्यातून तिला केस खाण्याची सवय असल्याचा संशय डॉक्टरांना आला. पुढील तपासणीनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.
शस्त्रक्रियेदरम्यान मुलीच्या पोटातून अर्धा किलो केसांचा गोळा काढण्यात आला. तपासणीतून हे स्पष्ट झालं ,की तृप्तीला गेल्या तीन-चार वर्षांपासून केस खाण्याचं व्यसन होतं. घरी कुणी लक्ष देत नसताना ती संधी मिळताच स्वतःचे किंवा इतरांचे केस खात होती. पालकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती सवय थांबली नाही आणि केस पोटात साठत गेले.
डॉ. उषा गजभिये यांनी सांगितलं की, “केस, धागे, नखं खाणं ही वागणूक मानसिक विकाराचं लक्षण असू शकतं.” पालकांनी मुलांमध्ये अशा वागणुकीकडे दुर्लक्ष न करता त्वरित लक्ष द्यावं, आणि गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असा त्यांनी सल्ला दिला.
सध्या तृप्तीची प्रकृती स्थिर असून ती बरी होऊ लागली आहे. मात्र ही घटना पालकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मुलांच्या बदललेल्या वागणुकीकडे दुर्लक्ष न करता संवाद साधणं, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत घेणे, हे आवश्यक आहे.
अमरावतीतील मुलीच्या पोटातून काय काढण्यात आले?
अमरावतीतील १० वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे अर्धा किलो केसांचा गोळा काढण्यात आला.
मुलीला कोणत्या आजारांचा त्रास होता?
मुलीला सतत पोटात वेदना, जळजळ, मळमळ आणि उलट्यांचा त्रास होता.
केस खाण्याची सवय कशी ओळखली गेली?
डॉ. उषा गजभिये यांनी मुलीशी थेट संवाद साधल्यानंतर तिला केस खाण्याची सवय असल्याचा संशय आला.
केस खाणे ही वागणूक का धोकादायक आहे?
केस, नखे किंवा धागे खाणे ही वागणूक मानसिक विकाराचे लक्षण असू शकते आणि पोटात गुठळी तयार होऊन गंभीर आजार होऊ शकतो.
पालकांनी मुलांमध्ये अशा वागणुकीबाबत काय करावे?
पालकांनी मुलांच्या असामान्य वागणुकीकडे दुर्लक्ष न करता त्वरित लक्ष द्यावे आणि गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.