खासगी कार्यालयात तलाठ्यांचा दरबार, गावचं कार्यालय सोडून शहरात तलाठ्यांची दुकानदारी, 'साम इन्व्हेस्टीगेशन'मध्ये तलाठ्यांचा पर्दाफाश

Talathi Running Private Office In Jalna Investigation: जालना जिल्ह्यात तलाठी सरकारी कार्यालय सोडून खासगी गाळ्यातून कारभार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Deserted government talathi office in Jalna while farmers wait outside private shops for basic services
Deserted government talathi office in Jalna while farmers wait outside private shops for basic servicessaam tv
Published On

खरीप हंगाम तोंडावर आलाय... आगामी काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीही मिळणार आहे.

त्यामुळे बळीराजा पीक कर्जासाठी आणि सातबारासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवतोय. पण जालन्यातले मुजोर तलाठी गावातून आणि सरकारी कार्यालयातूनही गायब झालेत! गायब... होय, विश्वास बसत नसेल तर जालन्यातल्या अंबड गावातल्या तलाठ्यांचं हे अधिकृत सरकारी कार्यालय पाहा...

पाहिलंत,

कोट्यवधी खर्च करुन तयार केलेलं हे कार्यालय कसं ओस पडलंय.. ना या कार्यालयात खुर्ची.. ना टेबल.. ना फाईल.. ना तलाठी... या सरकारी कार्यालयात सध्या पाहायला मिळतोय तो फक्त कचऱ्याचा ढीग आणि घाण

मग गावातला तलाठी गेला कुठे? ...साम टीव्हीने सुरू केली या कार्यालयातून बेपत्ता झालेल्या तलाठ्यांची शोधमोहीम... त्यात सामच्या टीमला ज्यासमोर आलं ते थक्क करणारं होतं. शहरातल्या एका व्यापारी गाळ्यात या महाभागांनी स्वतःचं खाजगी दुकान थाटलं होतं आणि तिथूनच सरकारी कारभार सर्रास सुरू होता. . सरकारी पगारावर खाजगी अड्ड्यातून धंदाच. अंबडसह जालना जिल्ह्यात अनेक तलाठी अशाच पद्धतीनं खाजगी कार्यालयात बसून जनतेची लूट करत असल्याचं सामच्या कॅमेऱ्यात कैद झालंय. पाहा हा पुरावा...

नियमांनुसार तलाठ्यानं गावात थांबून शेतकऱ्यांची कामं करणं बंधनकारक आहे. हक्काची जागा नसेल, तर ग्रामपंचायतीमधून कारभार करणं अपेक्षित असताना, हे मस्तवाल तलाठी शहरात स्वतःचे मोकळे अड्डे चालवून शेतकऱ्यांना वेठीस धरतायत. या तलाठ्यांची ही चोरटी कार्यालयं नेमकी आहेत कुठे? हेच माहीत नसल्यामुळे चक्रावून गेलेल्या बळीराजाचे अतोनात हाल होतायत. सरकारी कार्यालयातून परागंदा झालेले हे तलाठी या खाजगी अड्ड्यांवरही सहजासहजी भेटत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करून रिकाम्या हातानं परत जावं लागतंय.

शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी शासनानं गावागावात तलाठ्यांना कोट्यावधी खर्च करुन कार्यालयं बनवून दिली. पण शेतकऱ्यांच्या लुटीचा काळा धंदा तेजीत चालवण्यासाठी जिल्ह्याभरात अशी अनेक खासगी कार्यालय आजही सर्रास सुरुयेत आस्मानी आणि सुलतानी संकटानं आधीच खचलेल्या शेतकऱ्याला आता हे तुघलकी तलाठी कसे छळतायत, याचा पर्दाफाश साम टीव्हीने केलाय. या तलाठ्यांना ना कायद्याची भीती उरलीये ना प्रशासनाचा धाक! जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि खुद्द महसूल मंत्र्यांच्या आदेशालाही या वसुली बहाद्दरांनी केराची टोपली दाखवलीये. सरकारी कार्यालयाची कचराकुंडी करून, खाजगी दुकानदारी थाटणाऱ्या या भ्रष्ट तलाठ्यांवर आता शासन कोणती कारवाई करतं यावर साम टिव्हीची करडी नजरेय.

अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com