माधव सावरगावे
Nagpur To Mumbai Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राच्या विकासात गेम चेंचर ठरणार्या समृद्धी महामार्गावर (नागपूर-मुंबई) अंधाराचा फायदा घेत चोऱ्या केल्या जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या मार्गावर असणाऱ्या बोगद्यांमध्ये लुटीसाठी दगडफेक करण्याची मोडस ऑपरेंडी असल्याचे समोर आलेय. दगडफेक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील बोगद्यांजवळील अंधाऱ्या भागात वाहनांवर दगडफेक करून लुटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियावरील पोस्टनुसार, या मार्गावर पोलिसांची गस्त किंवा आपत्कालीन सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोऱ्या अन् दगडफेकीमुळे महाराष्ट्रातील गेम चेंजर ठरलेल्या समृद्धी महामार्गावर सध्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
छत्रपती संभाजीनगर ते नागपूर दरम्यानच्या या महामार्गावरील बोगद्यांमध्ये रात्रीच्या वेळी दगडफेक आणि लूटमारच्या घटना घडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात अज्ञात व्यक्तींनी वाहनावर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ रविवारी (15 जून 2025) अपलोड झाल्यानंतर व्हायरल झाला, मात्र तो नेमक्या कोणत्या तारखेचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
व्हायरल व्हिडीओनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी खासगी वाहनावर दगडफेक करून ते थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेने समृद्धी महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेमुळे प्रशासनावर रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवणे, बोगद्यांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असली, तरी अद्याप ठोस उपाययोजना झाल्याचे दिसत नाही. प्रवाशांनी रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगणे आणि शक्यतो गटाने प्रवास करणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
समृद्धीवर मागील दोन वर्षातील लुटमारीच्या घटना :
१ ) छत्रपती संभाजीनगरलगत कुटुंबाचे वाहन अडवून सोने लुटून मारहाण.
२ ) वैजापूर, जांबरगाव शिवारात रात्री दोन प्रवाशांच्या वाहनावर दगडफेक; त्यात एक जण जखमी.
३ ) नागपूर ते मुंबई मार्गावरील करजना गावाजवळ मध्यरात्री ट्रॅव्हल बसवर केली दगडफेक.
४ ) मेहकरजवळ एका कुटुंबाला अडवून रोख रक्कम व इतर साहित्य लुटले.
५)मुंबईकडे जात असलेल्या कुटुंबास मेहकरजवळ लुटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.