IMD Weather Forecast : महाराष्ट्रासह आज २४ राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी दक्षिण, पश्चिम, पूर्व, मध्य भारतासाठी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात असलेल्या उत्तर भारतातील अनेक भागांत पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तामिळनाडू, पुदुचेरी, केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकात १६ ते १८ जूनदरम्यान हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात १६ ते २२ जून यादरम्यान हलका ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा आणि सिक्कीममध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडमध्ये आज वादळी पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश , पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान , पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश येथे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि आसपासच्या क्षेत्रात समुद्रसपाटीपासून 3.1 किमी ते 7.6 किमी उंचीवर चक्रीवादळाची हालचल निर्माण झाली आहे. यामुळे दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मान्सून ओडिशा, विदर्भ आणि छत्तीसगडच्या काही भागांत पुढे सरकेल. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे १९ जूनपर्यंत पाऊस सुरू राहील.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावरील चक्रीवादळ आणि मराठवाड्यावरील कमी दाबाचा पट्टा यामुळे पाऊस तीव्र झाला आहे. पुढील ४८ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या पेरणीला गती मिळाली असली, तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. पावसामुळे मुंबई, पुणे, आणि कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.