सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे घरं व रस्ते पाण्याखाली गेले.
अक्कलकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले.
शिरवळवाडी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेती जलमय झाली.
महापालिकेच्या भोगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणी साचले. अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर, शेळगी या भागांत तर २ ते ३ फूट पाणी घरात शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी घरगुती साहित्य, विजेची उपकरणे पाण्यात भिजून खराब झाली.
अक्कलकोट तालुक्यातील वागदारी परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने थैमान घातले. सतत पडणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्याने वागदारी परिसरातील मोठ्या प्रमाणातील शेती पाण्याखाली गेली.
सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी बुधवारी सकाळी मित्र नगर, शेळगी परिसराची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे महापालिकेच्या भोगळ कारभाराबद्दल तक्रारी केल्या. शहरातील पाणी निचरा व्यवस्था कोलमडल्याने प्रत्येक पावसाळ्यात हा प्रश्न निर्माण होतो.
या पावसामुळे वागदारी परिसरातील नागरिकांचा बाहेरील संपर्क तुटला आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने गावात जाण्या-येण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केटसमोरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. सर्व्हिस रोडने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्या, तर दोनचाकी वाहनधारक अक्षरशः पाण्यात अडकले.
नागरिकांकडून महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, दरवर्षी पावसाळ्यात हेच चित्र पाहायला मिळते, तरी कोणतेही ठोस नियोजन का केले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील काही भागांमध्ये अजूनही पाणी आहे. या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे हाल झाले असून, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांवर मोठे संकट ओढावले आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत आणखी पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.