सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात लाचखोरीचा प्रकार उघड
अधीक्षक १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला
ACB ने सापळा रचून यशस्वी कारवाई केली
आरोग्य विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागात भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय उपचारांच्या बिलासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (रा. कणकवली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचारांचे बिल मंजुरीसाठी जिल्हा रुग्णालयात सादर केले होते. मात्र, या बिलाच्या फाईलमध्ये काही त्रुटी असल्याचे सांगत ती पूर्ण करून देण्यासाठी अधीक्षक महादेव तेली यांनी बिलाच्या एकूण रकमेच्या ३ टक्के लाच मागितली होती. ही रक्कम सुमारे १८ हजार रुपये होत होती. तक्रारदाराशी झालेल्या चर्चेनंतर अखेर १० हजार रुपयांमध्ये तडजोड करण्यात आली.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली. एसीबीच्या (ACB) अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्याचा निर्णय घेतला. नियोजनाप्रमाणे, जिल्हा रुग्णालयातील अधीक्षकांच्या कक्षातच सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महादेव तेली यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवांसाठी अशा प्रकारे लाच द्यावी लागणे ही गंभीर बाब असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.