
नाशिकमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा खणखणीत आवाज एआय प्रणालीद्वारे ऐकल्यानंतर उत्साह संचारलेल्या शिवसैनिकांमध्ये खासदार संजय राऊत यांनी दुप्पट ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराज यांचा संघर्ष छावा चित्रपटात दाखवण्यात आला. तोच संघर्ष शिवसेनेच्या, शिवसैनिकांच्या वाट्याला आज आला आहे, असं सांगतानाच परिवर्तन घडवून आणण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये असल्याचं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांचं भाषण (व्हिडिओ)
नाशिकमधील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निर्धार शिबिरात उपस्थित शेकडो शिवसैनिकांना संजय राऊत यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटात दाखवण्यात आलेल्या संघर्षाची कहाणी सांगून शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला. छावा नावाचा नुकताच चित्रपट आला होता. त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष पाहिला. तोच संघर्ष आपल्याही वाट्याला आला, असं संजय राऊत म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या काळात कवी कलश होते. संभाजी महाराज निराश झाले. सगळ्या बाजूने घेरले गेले. आता काय करावं हा प्रश्न त्यांना पडला; तेव्हा कवींनी त्यांना मंत्र दिला. तोच मंत्र शिवसैनिकांसाठी उपयोगाचा आहे. कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं की, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार.... या ओळींचा अर्थ सांगून संजय राऊत यांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला.
आपल्याला सुद्धा याच मार्गाने जायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज लढले. त्यांनी परिवर्तनाची दिशा दाखवली. महाराष्ट्र उभा राहिला. परिवर्तन घडवून आणण्याची ताकद शिवसैनिकांत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये झालं- राऊत
विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या पराभवावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. नाशिकच्या पराभवाची चर्चा झाली. नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं. तुलसी गब्बार्ड यांनी केलं. या मोदींच्या भगिनी आहेत. मोदी त्यांना सिस्टर तुलसी म्हणतात. ट्रम्प सरकारमध्ये त्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी सांगितलं की, ईव्हीएम हायजॅक होतंय. त्यामुळे निकाल बदलले जाऊ शकतात. ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवले जातात. तेव्हा महाराष्ट्राचा निकाल असा का लागला याचं उत्तर जगाला मिळतं, असं संजय राऊत म्हणाले.
या राज्यात काय चाललं आहे, असा सवालही त्यांनी विचारला. कुणाल कामराच्या विडंबन गीताच्या आधारे राऊतांनी एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. हे महाशय पुन्हा गावी गेले आहेत. मला भीती वाटतेय. अमावस्या आहे की पौर्णिमा. हे पुरोगामी महाराष्ट्र आहे. पण महाराष्ट्राला पौर्णिमा, अमावस्या आली की भीती वाटते. एवढी भीती कधीच नव्हती, असा उपरोधिक टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.