शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट; सुनावणीत खळबळ

Shiv Sena Symbol Row: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. २१ जूनच्या व्हॉट्सॲप मेसेजचा स्क्रीनशॉट, एकनाथ शिंदे यांना पाठवलेला मेसेज आणि मेहता यांचे महत्त्वाचे युक्तिवाद न्यायालयात मांडण्यात आले.
Shiv Sena Party Symbol
Shiv Sena Party Symbolsaam tv
Published On: 

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुरू असलेली सुनावणी संपली असून, आता उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत मेहता यांनी पक्षांतराच्या मुद्यावर महत्वाचे युक्तिवाद मांडले. एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्याचे किंवा पक्ष सोडल्याचे औपचारीक पत्र स्वीकारले गेले पाहिजे असे अनिवार्य नाही. संबंधित सदस्याचे प्रत्यक्ष वर्तनही महत्वाचे ठरते, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. यासाठी त्यांनी राजिंदर सिंग राणा खटल्याचा दाखला दिला. या प्रकरणात काही आमदारांनी विरोधी पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यपालांकडे पाठिंब्याचे पत्र दिले होते. संबंधित आमदारांचे हे वर्तन पक्षांचे तत्व स्पष्ट करणारे असल्याचे मेहता यांनी सांगितले.

दरम्यान, २१ जूनच्या व्हॉट्सॲप मेसेजचाही मेहता यांनी सुनावणीदरम्यान उल्लेख केला. बैठकीची वेळ दुपारी १२.३० वाजताची होती आणि एक मेसेज एकनाथ शिंदे यांना १२.३१ वाजता पाठवण्यात आला होता. त्याचवेळी संबंधित सदस्य संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगितले जात होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे संबंधित सदस्यांनी स्वेच्छेने राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडले, असा दावा केला जात असल्याचे मेहता यांनी नमूद केले. मात्र, प्रतिवादी सदस्यांशी संपर्क का होत नाही, याची कारणे जाणून घेण्यासाठीच बैठक आयोजित करण्यात आली होती, हे सुनील प्रभू यांनी दिलेल्या उत्तरावरून स्पष्ट होते, असा युक्तिवादही त्यांनी केला.

या प्रकरणात सादर करण्यात आलेला एकमेव पुरावा म्हणजे व्हॉट्सॲप मेसेजचा स्क्रीनशॉट आहे. मात्र, हा स्क्रीनशॉट केवळ मेसेज पाठवण्यात आल्याचा पुरावा ठरतो, असे मेहता यांनी न्यायालयात सांगितले. या युक्तिवादांनंतर आजची सुनावणी संपली असून, उद्या दुपारी २ वाजता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादात उद्याच्या सुनावणीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.