विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतची सुनावणी सध्या सुरू आहे. या सुनावणीमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळत असून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांच्याकडून उलटतपासणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत अनेक घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे सुनील प्रभू यांनी लंच ब्रेकआधी दिलेली साक्ष लंच ब्रेकनंतर बदलल्याने चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
आजच्या सुनावणीतही शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरतपासणी केली. यावेळी सुनील प्रभू यांनी प्रतिज्ञापत्रात 50 व्या परिच्छेदात एक पत्र जोडलं आहे. या पत्रावरुन त्यांनी सुनील प्रभू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हे पत्र सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवल्याचे सांगितले होते.
मात्र एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) हे पत्र पोहोचलेच नसल्याचा युक्तीवाद महेश जेठमलानी यांच्याकडून करण्यात आला. मात्र त्यांचा हा दावा सुनील प्रभू यांनी फेटाळून लावला. हे पत्र तुम्हीच लिहले आहे का? त्यावर तुमचीच सही आहे का? ते इंग्रजीमध्येच का लिहले? कायदेशीर बाबी उद्भवू शकतात म्हणून हे इंग्रजीमध्ये लिहले का? कायदेशीर बाबी उद्भवतील हे आधीच माहित होते का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
लंच ब्रेकनंतर साक्ष बदलल्याने सुनील प्रभूंची कोंडी..
यावेळी लंचब्रेकनंतर सुनील प्रभू यांनी साक्ष बदलल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. सुनील प्रभू यांनी प्रतिज्ञापत्रात 50 व्या परिच्छेदात जोडलेले पत्र हे एकनाथ शिंदे यांना वॉट्सऍपवर पाठवल्याचे सांगितले होते. मात्र लंच ब्रेकनंतर सुरू झालेल्या दुसऱ्या सत्रात त्यांनी आपली साक्ष बदलली. हे पत्र वॉट्सऍपवर नव्हेतर मेलद्वारे पाठवल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितले.
मी लंच ब्रेकनंतर याबद्दल खात्री केली, ज्यामध्ये हे पत्र मेलद्वारे पाठवल्याचे आढळले. असे सुनील प्रभू म्हणाले. तसेच त्यांनी आधी दिलेली साक्षही बदलण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांकडे केली. मात्र यावरुन शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंवर प्रश्नांची सरबत्ती केली. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.