
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग महादू बरोरा हे आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मुंबईतील मुख्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यावेळी माजी आमदारांसह शेकडो कार्यकर्तेही भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होणार असल्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकीय प्रवास आणि पार्श्वभूमी
पांडुरंग बरोरा यांनी २०१४ साली आमदार म्हणून विजय मिळवला होता. मात्र, २०१९ साली त्यांचा पराभव झाला. त्यांनतर २०२४ मध्ये त्यांना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा अवघ्या १३०० मतांनी पराभव झाला. मात्र, आज बरोरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
राजकीय वारसा
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे शहापूरमधून ४ वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे बरोरा कुटुंबाचे शहापूरमध्ये भक्कम राजकीय अस्तित्व आहे.
राजकीय पक्षफोडीचे राजकारण
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षफोडीचं राजकारण सुरू आहे. आमदार, माजी आमदार, पक्षप्रमुख, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आपल्या पक्षाची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
सध्या भाजपातही इनकमिंग सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे आणि अंबरिश घाटगे हे दोन्ही पिता पुत्र भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. तसेच आज शरद पवार गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. या इनकमिंगमुळे भाजपाची ताकद निश्चितच वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.