भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
आरोप-प्रत्यारोपांनी रंगलेल्या लोकसभा निवडणूकीच्या देशातल्या अखेरच्या टप्प्यापूर्वी अमित शहांनी शरद पवारांना लक्ष्य केलंय. शाहांनी ठाकरेंसोबत तुटलेल्या मैत्रीसाठी शरद पवारांना जबाबदार धरलंय. तर ज्यांनी खेळ सुरू केला त्यांनीच संपवावा, असंही एक्सप्रेस गृपला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी म्हटलंय.
अमित शहा म्हणाले आहेत की, 2019 च्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला बहुमत मिळालं होतं. मात्र शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडलं. उद्धव ठाकरे आमचे मित्र होते. आम्ही एकत्र निवडणूक लढवली होती. आता हा खेळ ज्यांनी सुरू केला त्यांनीच तो संपवावा.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मोदी-शहांच्या निशाण्यावर होते. पण उद्धव ठाकरे अडचणीत असले तर सर्वात आधी मी धावून जाईल, असं राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानापुर्वी मोदींनी केलं होतं. त्यानंतर आता भाजप-शिवसेना युती तुटण्यास शाहांनी पवारांना जबाबदार धरलंय. मात्र सातव्या टप्प्यातील मतदान वळवण्यासाठी ही शहांची नौटंकी असल्याचं ठाकरे गटाने म्हटलंय. यावरच बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, सातव्या टप्प्यातील मतदान वळवण्यासाठीची नौटंकी लोक स्वीकारणार नाहीत.
उद्धव ठाकरेंना 2019 मध्ये नाही तर 2014 मध्येच सोबत घेण्यासाठी रणनिती आखली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केला होता. शरद पवार म्हणाले होते की, शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढावं म्हणून 2014 मध्ये भाजपला पाठींबा दिला
महाराष्ट्रातलं मतदान संपल्यानंतर शहांनी हे वक्तव्य केलंय. शाहा हे राजकारणातले चाणक्य समजले जातात. त्यामुळे त्यांचं हे विधान इतर राज्यातल्या मतदानावर प्रभावासाठी असेल असं समजणं बाळबोधपणाचं ठरेल. दरम्यान, शहांनी तुटलेल्या युतीसाठी पवारांना व्हिलन ठरवून ठाकरेंना साद घालणं म्हणजे नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे की काय, अशी चर्चा सुरू झालीय. विशेष म्हणजे चार जूनच्या निकालाआधीच शहांनी एनडीएच्या विस्ताराची खेळी तर खेळली नाही ना, अशीही उत्सुकता निर्माण झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.