रत्नागिरी नगरपरिषदेने संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय
दर सोमवारी संपूर्ण रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा बंद
शीळ धरणात सध्या ९९.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध
रत्नागिरी शहराला दररोज सुमारे २० एमएलडी पाण्याची गरज
अमोल कलये, रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रत्नागिरी नगरपरिषदेने पाणी नियोजनासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू करण्यात येणार असून, दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कमी पाऊस आणि कडक उन्हामुळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपरिषदेने हा निर्णय घेतल्याचे समजते.
रत्नागिरी शहराला दररोज सुमारे २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या ९९.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असला, तरी आगामी काळातील पाण्याची गरज आणि पावसाचे अनिश्चित प्रमाण लक्षात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. उन्हाचा वाढता तडाखा आणि पावसातील संभाव्य खंड यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाण्याची बचत करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दर महिन्याला सुमारे ८० एमएलडी पाण्याची बचत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शहरात १२ हजारांहून अधिक नळजोडणीधारक असून, या निर्णयाचा परिणाम शहरातील नागरिकांच्या दैनंदिन पाणी वापरावर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतही कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यानुसार आगामी काळात दररोजच्या पाणीपुरवठ्यात १५ मिनिटांची कपात करण्याचे नियोजन केले जात आहे. पाण्याची उपलब्धता, शहराची गरज आणि हवामानातील बदल यांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद सज्ज झाली असून, पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यावर भर दिला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.