

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Ramdas Kadam Sunil Tatkare controversy : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "सुनील तटकरे हे कोणाचेही होऊ शकत नाहीत, ते बेईमान माणूस आहेत," अशी टीका करत रामदास कदम यांनी अजित पवारांच्या कथित घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा हात आहे का, याची सखोल चौकशी करण्याची थेट मागणी केली आहे. कदम यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं
सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या जुन्या राजकीय संबंधांचा उल्लेख करताना रामदास कदम म्हणाले, "भूतकाळात तटकरे यांच्या निवडणुकीत आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले होते. मात्र, त्यावेळी अनेकांनी मला तटकरे कोणाचेही होणार नाहीत, ते बेईमान आहेत आणि भविष्यात मदत करणार नाहीत, असा इशारा दिला होता. दुर्दैवाने त्यावेळी मी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले."
गुहागरमध्ये युतीधर्माच्या विरोधात काम केल्याचा आरोप
विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्या विरोधात तटकरे यांनी काम केल्याचा आरोपही कदम यांनी केला. "महायुतीमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना एकत्र असतानाही गुहागर मतदारसंघात तटकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि भास्कर जाधवांना छुपी मदत केली," असा दावा त्यांनी केला.
पोयनाळ धरणावरून तटकरेंना लक्ष्य
कोकणातील धरणांच्या मुद्द्यावरूनही रामदास कदम यांनी तटकरेंवर निशाणा साधला. "कोकणातील १६ धरणांबाबत सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या आरोपांचा संदर्भ देत त्यांनी पोयनाळ धरणाचा मुद्दा उपस्थित केला. अनेक वर्षे या धरणाचे काम रखडल्यामुळे १४ गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले आणि याला संपूर्णपणे तटकरेच जबाबदार आहेत," असा आरोप त्यांनी केला.
"स्वतः उपमुख्यमंत्री व्हायचे होते"
सुनील तटकरे यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असा टोला लगावत कदम म्हणाले, "हा माणूस अत्यंत महत्त्वाकांक्षी असून राजकीय स्वार्थासाठी काहीही करू शकतो." तसेच तटकरेंना उद्देशून आक्रमक भाषेत सुनावताना ते म्हणाले, "माझ्या शेजारी बसण्याची तुझी औकात तरी आहे का?"
अजित पवारांच्या कथित घातपाताच्या चौकशीची मागणी
रामदास कदम यांच्या या वक्तव्यातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे त्यांनी अजित पवारांच्या कथित घातपाताबाबत व्यक्त केलेला संशय होय. "अजितदादांच्या घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा काही हात आहे का? या अँगलनेही तटकरेंची कसून चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी कदम यांनी केली आहे.
महायुतीतील एका ज्येष्ठ नेत्याने दुसऱ्या घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर थेट एवढे गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या खळबळजनक आरोपांवर सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.