Raj Thackeray : 'सुख पाहता...' राज ठाकरेंनी सांगितली ३७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण, पोस्टमधून दिसली ती तळमळ

Raj Thackeray on Sukh Pahata play : राज ठाकरे यांनी त्यांच्या लायब्ररीत ‘सुख पाहता’ नाटकाचे पुस्तक सापडल्यानंतर ३७ वर्षांपूर्वीची आठवण सोशल मीडियावर शेअर केली. १९८९ मध्ये या पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी स्वतः तयार केल्याचा किस्सा सांगत मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाची आठवण त्यांनी जागवली.
Raj Thackeray Latest Marathi News
Raj Thackeray Latest Marathi NewsSaam TV Marathi
Published On

Raj Thackeray Latest Marathi News : मनचे अध्यक्ष राज ठाकरे हे रोखठोक राजकीय भूमिकेसोबतच त्यांच्यातील कलाकार आणि रसिकतेसाठीही ओळखले जातात. त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक आणि ३७ वर्षांपूर्वीची आठवण शेअर केली आहे. आपल्या खासगी लायब्ररीत पुस्तक शोधत असताना त्यांच्या हाती ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्या 'सुख पाहता' या नाटकाचे पुस्तक लागले अन् ते भूतकाळात रमले. १९८९ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ (Cover Page) स्वतः राज ठाकरे यांनी साकारले होते. त्यावेळचा किस्सा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मांडला आणि नाटकाला पुन्हा तेच दिवस यावेत अशी इच्छा व्यक्त केली.

३७ वर्षापूर्वीचा किस्सा सांगताना राज ठाकरेंनी महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेय. आधी नाटके फक्त पाहिली जात नव्हती तर त्यांची पुस्तकेही आवडीने वाचली जात होती. सध्याच्या डिजिटल युगात मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहावा आणि नाटकाची पुस्तके झपाटून वाचण्याचा तो काळ पुन्हा यावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्ती केली. राज ठाकरेंच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Raj Thackeray Latest Marathi News
Maharashtra Politics: ठाणे-कोकणात मविआला मोठा धक्का, फक्त १० जागांचा अंदाज, सर्व्हेचे आकडे काय सांगतात?

राज ठाकरेंची पोस्ट

काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक 'सुख पाहता' या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर. तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं !

घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं 'सुख पाहता' नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची. असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो.

पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ.

एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती.

आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं. मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा...

Raj Thackeray Latest Marathi News
Samruddhi Expressway : ‘समृद्धी’वर पोहोचण्यासाठी लागणार १०० रुपये, आमणे-ठाणे प्रस्तावित मार्गावर टोलचा प्रस्ताव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com