राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुंबई येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी विरुद्ध अमराठी वादाबाबत बोलल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे चांगलेच संतापले आहे. 100 वर्षांचा संघाचा प्रवास-नवीन क्षितिज हा दोन दिवसीय व्याख्यानमाला वरळी डोममध्ये पार पडला. या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेता सलमान खानची उपस्थिती ही मोठा चर्चेची विषय ठरली. याच कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले, समाजात भाषेच्या आधारावर भेदभाव आहे, असे नाही. जेव्हा काही लोकांकडून तशी मांडणी केली जाते तेव्हा काही लोकांच्या हातून तसे घडते. याचा अर्थ सर्व मराठी भाषिक लोक तलवारी घेऊन बाहेर आले आणि अन्य भाषिक लोक भाले घेऊन बाहेर आले असे होत नाही. हा सगळा वाद सुरू असताना आपापसातील व्यवहार सुरूच होते, मैत्री कायम होती. हा एक स्थानिक आजार आहे, त्याला सार्वजनिक करू नये असे मोहन भागवत म्हणाले होते.
या सगळ्यावर आता राज ठाकरे यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो. भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का?
जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते. परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या! कलाकारांनी लावलेल्या उपस्थितीवर राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.