मुंबई : हवामान खात्यानं दिलेल्या इशा-यानुसार राज्यातील बुहतांशी जिल्ह्यात आजही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. साेमवारी झालेल्या पावासामुळे राज्यातील भंडारा, गाेंदिया, अमरावती जिल्ह्यात काही अप्रिय घटना घडल्या आहेत. दरम्यान आज (मंगळवार) सकाऴपासून प़डत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक २० मिनिटे उशिरा धावत आहे. कर्जतहुन मुंबईच्या दिशेने जाणारी आणि मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक २० मिनिटे उशिरा धावत आहे. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक देखील खाेळंबली आहे. (Mumbai Rains)
ठाण्यात पावसाचा जाेर
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठाणें शहरात पावसाची रीप रिप सुरूच आहे. शहरात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. आज देखील पावसाने सकाळी पासूनच हजेरी लावली आहे. शहरातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावली आहे. (Thane Rain Update)
पालघरला पावसानं झाेडपलं
पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असून ठिक ठिकाणी झाड आणि विद्युत खांब उन्मळून पडत आहेत. बोईसर नवापूर रोडवरील कुंभवली नाका येथे मुख्य वीज वहिनीचा खांब चालत्या बाईक स्वाराच्या बाईकवर पडल्याने योगेश कांतीलाल पागधरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला बोईसरच्या तूंगा हॉस्पिटलला नेण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. (Palghar Rain Update)
गावाची विज गेली अन्
वाशिम जिल्ह्यात साेमवार सकाळपासून सर्वत्र मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले हाेते. पुरामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला तर अतिपावसमुळे अनेक गावांत पाणी शिरले. रिसोड तालुक्यातील रिठद गावाजवळ पाण्याने वेढा मारल्याने वीज रोहित्र पाण्यात गेले. त्यामुळे गावातील लाईट गेल्यामुळे गाव अंधारात राहण्याची वेळ आली. मात्र गावातील वीज कर्मचारी रामभाऊ बोरकर यांनी चक्क पोहत जाऊन वीज दुरुस्ती करीत सुरळीत केली. त्यामुळे गावाची समस्या सुटली. त्यामुळं त्यांच्या या कामाच ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे.
जिल्हा प्रशासनाने वृद्ध दांपत्यास मदत करावी
वाशिम साेमवार सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला. या अतिपावसमुळे मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथील दामोदर करडे यांच घर कोसळले यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतमजूर कुटुंबाच्या घरातील अन्नधान्य भिजले आहे. त्यामुळं वृद्ध दांपत्याचा संसार उघड्यावर आला आहे. जिल्हा प्रशासनाने या वृद्ध दांपत्याला तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
म्हशींना बाहेर काढण्यासाठी गेलेला दिगंबर परतलाच नाही
बोडीच्या पाण्यात बसलेल्या म्हशींना बाहेर काढताना पाय घसरून पडल्याने एकाचा बोडीत बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप येथे उघडकीस आली आहे. दिगंबर गोमा बावनकुळे (मुरमाडी) असे त्याचे नाव आहे. त्यांच्या मालकीच्या म्हशी घरालगतच्या बोडीतील बसल्या होत्या. रात्री अंधार पडत आल्याने म्हशींना बाहेर काढण्यासाठी दिगंबर गेला मात्र त्याचा पाय घसरला आणि तो बोडीत पडला. शेजारच्यांनी आरडाओरड केली. शोधाशोध केली, मात्र थांगपत्ता लागला नाही. अखेर त्याचा मृतदेहच आढळून आला आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आता परिवार आहे. या घटनेचा तपास पालांदुर पोलिस करीत आहे. (Bhandara Rain Update)
रायगडात नद्या दुथडी भरुन वाहताहेत
गेले 48 तास रायगडमध्ये पावसाचा जोर कायम असुन जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रोहा तालुक्यातुन वाहणाऱ्या कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन नदी किनारच्या भागात पाणी साचले आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र हलक्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत असुन कोठेही पुरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. (Raigad Rain Update)
गोंदियाला रेड अलर्ट
सलग दोन दिवसांपासून तूफान हजेरी नंतर आज तिसऱ्या दिवशी गोंदिया जिल्हाला हवामान खात्याच्या रेड अलर्ट मिळाला असून जिल्ह्यात सर्वदूर अतिमुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्यानं दिले आहे. त्यामुळे पुढील काही तास अति महत्वाचे मानले जात आहे. आधीच्या आलेल्या पावसाने अनेक घरांचे नुकसान,शेकडो शेतीचे नुकसान असा प्रकार घडला असतांना आता हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट मोड़ वर आहे. येत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात धरणं तुडंब भरले असून नदी नाले ओसांडून वाहत असल्याने गोंदिया पुर नियत्रंण कक्षाला स्टैंड बाय मोड़ वर ठेवण्यात आले आहे. (Gondia Rain Update)
भंडाऱ्यात ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार काल मध्यरात्री पासून भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी पावसाची तूफान बॅटींग सुरु आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्हाला हवामान खात्याच्या ऑरेंज अलर्ट मिळाला असल्याने आज आणि उद्या (ता. 10) पुढील काही तास अति महत्वाचे मानले जात आहे. आधीच्या आलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणं तुडंब भरले असून नदी नाले ओसांडून वाहत असल्याने भंडारा जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट मोड़ वर आहे. (Bhandara Rain Update)
निरगुडसरात घराची भिंत काेसळली
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे निरगुडसर येथील नारायण टाव्हरे या शेतकऱ्याच्या राहत्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडलीय. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचा संसारात उघड्यावर पडला आहे.
अमरावतीत सहा जण वाहून गेले
अमरावती जिल्ह्यात पावसानं कहरच केला. साेमवारी एका दिवसांत अमरावती जिल्ह्यातील सहा जण पुरात वाहून गेले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातल्याने तीन मजूर तर वरुड तालुक्यात दोन जण आणि तिवसाच्या शिवनगावात एक वृद्ध पुरात वाहून गेला. पुरात वाहून गेलेल्या सहा जणांचा शोध सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात आज व उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
माळू नदीला पूर; चारचाकी गेली वाहून
अमरावतीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. यात माळू नदीला मोठा पूर आला आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने सालबर्डी येथे भाविकांची मोठी रीघ असते. यातच भाविक माळु नदीच्या बाजूला गाड्या उभ्या करून मंदिरात प्रवेश करतात अशीच एक गाडी पुलाच्या बाजूला उभे असताना पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही गाडी वाहून जात असताना दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. सुदैवाने या गाडीमध्ये कोणीही नसल्याने जीवित हानी झालेली नाही.
कोराडी नदीला पूर
सिंदखेडराजा तालुक्यातील सवडत ते गजरखेड या दोन्ही गावच्या मधून कोराडी नदी वाहते कालपासून जिल्ह्यात सततधार पाऊस सुरु असल्याने कोराडी नदीला पूर आल्याने नदीवरील् पूर वाहून गेला आहे. त्यामुळे दोन्ही गावाचा एकमेकांशी व तालुक्याशी संपर्क तुटला आहे. कोराडी नदीवरील पूल कायमस्वरूपी बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुसद- हिंगोली राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद
गेल्या तीन दिवसंपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्रात पाणी सोडल्या जात आहे. त्यामुळे इसापूर धरणातून पैनगंगा नदी पत्रात पाणी सोडल्याने पुसद- हिंगोली राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शेंबाळपिंपरी जवळील पैनगंगा नदी पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे
नागपुरात सखल भागात साचलं पाणी
नागपुरात रात्रभर सततधार पाऊस सुरू असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. पुढील 24 तासात नागपुर भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला आहे.
पुजारी टोला धरणातून पाणी साेडलं
गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून आज सकाळी धरणाची पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे धरण सुस्थीतीत नियंत्रणाकरीता सुरू असलेल्या 13 गेट पैकी सध्या 13 गेट (वक्रद्वार) सुरु करण्यात आली. यात 8 गेट 0.60 मीटरने ते 5 गेट 0.30 मीटरनी सुरू आहे. यामधून 16000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
कोयना धरण चार टीमसीनं वाढलं
सातारा जिल्ह्यात आणि कोयना धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे धरणात येणारे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासात कोयना धरणातील पाणी साठ्यात चार टीमसी पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
कोयना धरण पाणी साठा - 73.18 टीएमसी (69.53 टक्के)
धरणात येणारे पाणी 49654 क्युसेक
गेल्या 24 तासात कोयना, नवजा आणि महाबळेश्वरात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.
कोयना 175 मिली मीटर
नवजा 226
महाबळेश्वर 197
गोसीखुर्द धरणातून पाणी साेडलं
गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा हजेरी लावताच धरणात पाण्याची आवक वाढल्याने गोसीखुर्द धरणाचे दरवाज्यात वाढ करण्यात आली असून आता केवळ 33 पैकी 33 दरवाजे एक मीटरने उघडे आहे. या 33 दरवाज्यातुन 6973 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विशेष म्हणजे धरण नियंत्रित असल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असला तरी मात्र नदी काठीच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोपरगावात घरांत, दुकानांत पाणी शिरलं
कोपरगाव शहरात काल दमदार पावसाने हजेरी लावल्याने ओढे नाल्यांना पूर आला. रस्ते जलमय झाले तर नाले ओसंडून वाहत असल्याने शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे आतोनात हाल झाले. तसेच अनेक तळ मजल्यातील दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पालिकेच्या भूमिगत गटार प्रकल्पाचा पूर्ण फज्जा उडाल्याचे दिसून आले. यावेळी काळे आणि कोल्हे कारखान्याची यंत्रणा नागरीकांच्या मदतीला धावून आली.
भंडारा शहरात घरात घुसले पावसाची पाणी
काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा शहरातील काही भागांमध्ये पाणी शिरलं आहे. रोड निर्मितीच्या वेळेस उंच रोड बनवल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी संपूर्ण लोकांच्या घरात जात आहे. त्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. वैशाली नगर, रुक्मिणी नगर या परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा प्रचंड नुकसान झालेला आहे. दूसरीकड़े खात रोड परिसरात असलेल्या मंगल कार्यलयात गुड़घाभर पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या नुकसानाची भरपाई शासनाने लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आता नागरिक करीत आहेत. ही परिस्थिति दरवर्षी येत असल्याने यापुढे आमच्या घरात किंवा दुकानात पाणी शिरणार नाही अशी व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी जयश्री हटवार यांच्यासह रहिवाशांनी केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.