

अक्षय बडवे, साम टिव्ही
आजवर तुम्ही ठिकठिकाणी चोरी चे प्रकार ऐकले असतील. कधी सोनं चांदी ची चोरी तर कधी मोबाईल, वाहनं किंवा इत्यादी मौल्यवान गोष्टींची चोरीची प्रकरणं नेहमीच बातम्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचली असतील पण आज आम्ही तुम्हाला असा एक प्रकार सांगणार आहोत की तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. याचं झालं असं आहे की राज्यातून ठिकठिकाणच्या शेतातून चक्क डाळिंब चोरीला जातायत. मेहनतीने, कष्टाने उभारलेल्या शेतातून डाळिंब चोरीला गेल्याने शेतकरी वर्गातून मोठी नाराजी व्यक्त केली जातेय.
पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत डाळिंबाची शेती केली जाते. सौम्य हिवाळ्यासह उष्ण आणि दमट हवामान या फळासाठी आदर्श आहे. डाळिंबाची लागवड प्रामुख्याने जून-जुलै मध्ये असलेल्या खरीप हंगामात तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर मधील रब्बी हंगामात दोन्ही वेळेला करता येते. साहजिकच राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्याने शेतकरी आनंदी आहे आणि अनेक गावांमध्ये डाळिंबाची शेती ही शेतकऱ्यांसाठी उपजिविकेचे साधन आहे. पण ते म्हणतात ना शेतकऱ्यांच्या आनंदावर कधी विरजण पडेल याचा काही नेम नाही. असाच अनुभव राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आलाय कारण त्यांच्या शेतातील डाळिंब चोरीला जातायत.
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याचे ४.५ हजार किलो डाळिंब चोरीला
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात शहाजी तुकाराम वाळुंज नावाचे शेतकरी आहेत. वाळुंज हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह शेती करून घर चालवतात. त्यांची गावात ९ एकर जमीन असुन त्यामधील 2.5 एकर जमीनीत गेली 5 वर्षापूर्वी पासून डाळिंबाची १००० झाडांची लागवड त्यांनी केली आहे. गेल्या सात महिन्यांपूर्वी डाळिंबाने बहार धरलेला होता. जुलै महिन्यात त्यातील २५० झाडांची फळ हे झारखंडचा यासीन शेख या व्यापाऱ्याला त्यांनी विकली होती. २ जुलै रोजी सकाळी ८ वाजता दुसऱ्या शेतातील द्राक्षे बाग असल्याने वाळुंज त्या शेतात गेले. ट्रॅक्टर घेऊन परत वाळुंज त्यांच्या डाळिंबाच्या पिकात औषध फवारणी करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना डाळिंबाच्या झाडाचे मोठमाठी फळे कोणीतरी चोरून नेल्याचं त्यांना दिसून आलं
त्यांनी त्यांच्या शेजारील इतरांना बोलावलं आणि त्यांनी शेताची पाहणी केली त्यावेळी डांळीब बागेतील 750 झाडांवरची अनेक फळं चोरून नेल्याचं त्यांना समजलं. तक्रारीत म्हणल्यानुसार, वाळुंज यांच्या शेतातून ४५०० किलोचे डाळिंब चोरीला गेली आहेत. त्याची किंमत ४.५ लाखांपेक्षा अधिक असल्याचं त्यांनी तक्रारीत उल्लेख केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूरच्या सांगोल्यात सुद्धा शेतातून गायब झाले डाळिंब
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात सुद्धा असाच प्रकार या वर्षाच्या जून महिन्यात घडला. सांगोला तालुक्यातील हातीद गावात अल्ताफ मुल्ला हा शेतकरी आहे. अल्ताफ त्याच्या आई, बायको आणि मुलासह त्याचा संसाराचा उदरनिर्वाह करतो. गावच्या वावरात अल्ताफची २ एकर शेती. यात त्याने डाळिंब लावले होते. अनेक वर्षांपासून अल्ताफ हा डाळिंबाची शेती करतो. यंदा सुद्धा त्याने शेतात भगवा डाळिंब या प्रजातीचे डाळिंबे लावली होती.
१३ जून रोजी नेहमीप्रमाणे तो शेतात निघाला. तिथे पोहचताच त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही कारण कष्टाने आणि घाम गाळून उभ्या केलेल्या शेतातील ३०० झाडांवरची डाळिंब गायब झाली होती. ६० हजार रुपये किंमतीचे ३ ते ३.५ टन डाळिंब चोरीला गेल्यामुळे हताश झालेल्या अल्ताफ ने त्याच्या भावाला याबाबत सांगितलं. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने १२ तारखेच्या रात्री शेतात येऊन झाडांची कत्तल करत थेट डाळिंब लंपास केली होती. हतबल झालेल्या अल्ताफ ने थेट पोलिसात धाव घेतली. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सुद्धा तात्काळ याची दखल घेत सांगोला पोलिस ठाण्यात या चोरीच्या प्रकरणात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आज गुन्हा दाखल होऊन तब्बल पाच महिने उलटले असले तरीसुद्धा अल्ताफ ला नात्याचे डाळिंब परत मिळाले न पोलिसांना तो चोर सापडला. अल्ताफने सरकारकडून या संपूर्ण प्रकरणी दखल घ्यावी अशी विनंती केली आहे.
राज्यातील या दोन घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. शेतात शिरून रात्रीचा फायदा घेत थेट डाळिंब चोरी करणारी टोळी तर राज्यात सक्रिय नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय. परिणामी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रात्री शेतीवर पहारा द्यायला सुरुवात केली आहे. असं असलं तरी सुद्धा योग्य वेळीच या टोळीच्या मुसक्या आवळणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.