

Summary -
अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलचे तीन व्हिडीओ पोस्ट करीत सरकारवर हल्ला चढवला.
सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, पण आमदारांकडे पैशांचे गड्डे आहेत असा आरोप.
व्हिडीओमुळे हिवाळी अधिवेशनात मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता.
दानवेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना टॅग करून उत्तरे मागितली.
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली. अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी 'सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत', असे म्हणत सरकारला धारेवर धरले आहे. तसंच व्हिडीओत दिसणारे आमदार कोण आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.
अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ३ व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिले की, 'या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?' अंबादास दानवे यांनी हे व्हिडीओ पोस्ट करत सरकारलाच अनेक सवाल केले आहेत.
अंबादास दानवे यांनी हे व्हिडीओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला टॅग केले आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये केलेल्या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावीत अशी मागणी केली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवशेनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजू शकतो. या मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. सरकार यावर नेमकं काय उत्तर देतेय हे पाहणे महत्वाचे राहिल.
दरम्यान, अंबादास दानवेंनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यामध्ये दिसणारी व्यक्ती शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासारखी दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर महेंद्र दळवी यांनी साम टीव्हीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट अंबादास दानवे यांना चॅलेंज केले आहे. महेंद्र दळवी म्हणाले की, 'माझं नाव समोर आलं तर मी राजीनामा देईल. दानवेंनी पूर्ण व्हिडीओ दाखवावा. अंबादास दानवे यांनी पुरावे सादर करावेत. दानवेंना कुणी विचारत नाही.', असे म्हणत महेंद्र दवळी यांनी दानवेंनी टाकलेल्या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती मी नसल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.