रिल्स, स्टंटबाजी आणि जिवाशी खेळ

Reels Risk : सोशल मीडियासाठी स्टंट करताना तरुण जीव गमावत आहेत. प्रसिद्धीच्या नादात होणारे अपघात आणि मानसिकतेमागचं वास्तव समजून घ्या या सखोल लेखातून.
waterfall dives
Selfie stuntsgoogle
Published On

- शामल भंडारे

पाण्यात वाहून गेला, कड्यावरून तोल गेला, नदीत पोहताना बुडाला, मित्र व्हिडिओ शूट करत राहिला, वेगावरचं नियंत्रण सुटलं, सेल्फी काढताना तोल गेला, छोटी चूक जिवावर बेतली, वगैरे वगैरे...! अशा घटनांबद्दल आपण कित्येकदा ऐकतोय, वाचतोय. दररोज अशा किमान दोन घटना तरी आपल्या कानावर येतात. हे सगळं वारंवार का घडतंय? यामागची कारणं काय आहेत? असे एक ना अनेक प्रश्न समोर उभे आहेत. या भीषण अपघातांची कारणं मात्र तितकीच क्षुल्लक असतात. त्यातलं एक कॅामन कारण- मोह!

waterfall dives
अचानक Blood Pressure वाढल्यास काय करावे? जाणून घ्या महत्वाची माहिती

सगळा खेळ आहे- वेळीच मोहाला न आवरण्याचा. सेल्फीचा मोह, जीवघेण्या उंचीवर जाण्याचा मोह, आपण स्टंट्स करू शकतो हे दाखवण्याचा मोह, प्रसिद्धी मिळवण्याचा मोह… आपण साहसी आहोत हे दाखवण्याचा इतका अट्टहास की जीवावर बेतणारा क्षण साहसानं दूर करण्याइतपत क्षमताच उरलेली नसते. तो क्षण इतका भारी पडतो की त्या ठिकाणी दैव कमजोर निघालं की संपलं. मग बातम्यांमध्येच यायचं. प्रशासनाचं लक्ष नाही का, असा सवाल विचारला जातो. पण मुळात चूक तिथे धोक्याच्या ठिकाणी पोहोचणाऱ्या पर्यटकांची असते, सेल्फीची हौस भागवून घेणाऱ्या सोशल मीडिया यूजरची असते. धबधब्याच्या ठिकाणी किंवा उंच कड्यांवर अनेकदा सूचनांचे फलक असतात. पण स्वतःच्या सुरक्षेचा नाहक आत्मविश्वास बाळगून या फलकांनाच फाट्यावर मारलं जातं. तत्वतः त्यावेळी प्रशासन १०० टक्के कारणीभूत नसतंच.

लोकांच्या आततायीपणाचं ताजं उदाहरण म्हणजे साताऱ्यातील टेबल पॉईंटवरचं. टेबल पॉईंटवर चारचाकी गाडी घेऊन स्टंट करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलयं. रिल्सच्या नादात याआधीही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वर्षासहलीसाठी अनेक जण धबधब्यांची वाट धरतात. मात्र हाच धबधबा त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. काही उदाहरणं सांगायची झाल्यास- गेल्या आठवड्यातच रायगडच्या माणगावमधील चन्नाट धबधब्यावर तरुणानं पोहण्यासाठी उंचावरुन उडी मारली. त्यावेळी त्याने आपल्या मित्रांना पोहण्याचा व्हिडिओ काढायला सांगितला आणि मृत्यू झाला. पहिलीच घटना नाही तर काही महिन्यांपूर्वी माणगाव येथीलच कुंभे धबधब्याजवळ रील्सचे शूटिंग करताना 300 फूट दरीत पडून मुंबईतील ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा मृत्यू झाला होता. अशा कित्येक घटना आहेत शिवाय कित्येक घटनांची आपल्याकडे नोंदही नाही किंवा कुठे चर्चाही नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लोक आपल्याला पाहतात, फॉलो करतात आणि आपलं कसं मस्त चाललंय आणि आपण किती धाडसी आहोत हे दाखवण्याची ही सगळी मानसिकता. या मानसिकतेचा उगम पण याच सोशल मीडियातून होतो. ट्रेकिंग, स्टंट्स करून फॉलोवर्स वाढतात, चर्चा होते, लोक आपल्या प्रोफाईलला ओळखू लागतील, या सगळ्यात स्वत:च्याच जीवावर उठणारी ही स्टंटबाजी करणारी मंडळी.

पोस्ट आणि लाईक्सच्या आभासी जगात स्टंटबाजांना घरच्यांचीही पर्वा नसते. कित्येक मंडळी फिरण्यासाठी, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी कमी आणि फक्त आपण आपलं आयुष्य कसं मस्तमौला चाललंय आणि आपण किती फिरतो हे दाखवण्यासाठी धोकादायक ठिकाणी जातात आणि या नादातच फसतात. या आभासी जगातली आणि खऱ्या आयुष्यातली तफावत किती मोठी का असेना? दिसायला आपण मजेत आहोत या अट्टाहासात चाललेला हा खटाटोप.

इतका बिनधास्तपणा येतो कुठून आणि ही मानसिकता नेमकी काय आहे यावर आम्ही मसोपचार तज्ञांकडून माहिती घेतली. मानसशास्त्रज्ञ पूर्वा दिक्षीत यांनी सांगितल्याप्रमाणे- 'हे कृत्य बेजबाबदारपणातूनच येतं. सोशल मिडीयावर प्रसिद्ध होण्याची इच्छा, बेजबाबदारपणा, सूचनांकडे दुर्लक्ष करण्याची सवय या गोष्टी या अपघातांना जबाबदार आहेत. खरतंर सगळे तरुण बेजबाबदार नसतात. काही लोक संकटात अडलेल्यांना वाचवण्याचंही काम करतात. पण लहानगे आपल्याला बघून शिकतात, आपल्याला इतर लोक फॉलो करतात याची जबाबदारी बाळगून तरी तरुणाईने सजग राहणं गरजेचं आहे. आपण वाहून न जाता इतरांना सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हे ध्यानात ठेऊन वागायला हवं.'

असो... आपण निसर्गाला आणि निसर्गातल्या काही घटकांना जितकं सहजपणे घेतो तितकं ते सहज नाही. निसर्ग आपल्याला वेळोवेळी फक्त समजून घेतो. कधीतरी त्याचापण उद्रेक होतो. प्रशासनाच्या सूचना आणि परिस्थिती समजून त्या त्या वेळेला स्वत:ला आणि इतरांना सांभाळून घेण्यातच समजूतदारपणा आहे एवढं नक्की.

waterfall dives
Ashadh Special : तुम्ही आषाढ तळला की नाही? झटपट बनवा हे तळणीचे खास पदार्थ

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com