Employment Scam: नोकरीला एक; पगार घेतो दुसराच..!

देवळाली (ता. कळंब) येथील जागृती विद्यामंदिर शाळेत एका अंगठेबहाद्दराला शिपाई म्हणून नियुक्त केले. एवढेच नाही ज्याची शिपाई म्हणून नियुक्ती केली त्याला दहा वर्षांनंतरही आपण एका शाळेत शिपाई आहोत हेच माहीत नाही
Employment Scam: नोकरीला एक; पगार घेतो दुसराच
Employment Scam: नोकरीला एक; पगार घेतो दुसराच- Saam Tv
Published On

उस्मानाबाद : देवळाली (ता. कळंब) येथील जागृती विद्यामंदिर शाळेत एका अंगठेबहाद्दराला शिपाई म्हणून नियुक्त केले. एवढेच नाही ज्याची शिपाई म्हणून नियुक्ती केली त्याला दहा वर्षांनंतरही आपण एका शाळेत (School) शिपाई आहोत हेच माहीत नाही. त्याचे वेतन अन्य व्यक्तीच ढापत आहे. विशेष म्हणजे याला शिक्षण विभागाने मंजुरी दिलेली आहे. (Osmanabad fake appointment Scam news)

गुणवंत राऊत असे या बनावट शिपायाचे नाव आहे. आता या प्रकाराचा भांडाफोड झाल्यानंतर अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असून, चौकशीचे कारण सांगत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिसरात उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची (Students) पटसंख्येद्वारे स्थानिकस्तरावर शैक्षणिक (Education) सुविधा दिल्यानंतर त्या संस्थेची तपासणी होते. त्यानंतर जिल्ह्यातील संबंधित शैक्षणिक संस्थेला जिल्हा परिषद मंजुरीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करते.

काही ठरावीक काम केल्यानंतर अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित केला जातो. प्रस्ताव सादर करताना शाळेत किती विद्यार्थी आहेत, त्यासाठी किती शिक्षक, शिपाई शाळेत कार्यरत आहेत, त्या संबंधित शिक्षक, शिपायाची पात्रता तपासली जाते. याचे काम संबंधित जिल्हा परिषदेकडून केले जाते. जर या सर्व बाबी योग्य असतील तर तसा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविला जातो.

देवळाली (ता. कळंब) येथील जागृती विद्यामंदिर या शिक्षण संस्थेला ४० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. गेल्या १० वर्षांपासून या संस्थेत एक शिपाई कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित शिपायाचा बनावट दाखला शासनाकडे सादर केला आहे. ज्या शाळेतील दाखला आहे, त्या शाळेनेही आमच्या शाळेतील हा दाखला नसल्याचा लेखी खुलासा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केला आहे.

Employment Scam: नोकरीला एक; पगार घेतो दुसराच
Jalgaon: जिल्‍ह्यात ७१ शिक्षक, २१ विद्यार्थी कोरोना बाधित

शिपायालाही माहिती नाही

आपण एका संस्थेत शिपाई म्हणून काम करीत असल्याची माहिती अंगठेबहाद्दर शिपायाला नाही. गेली १० वर्षे या शिपायाचा पगार दुसरीच व्यक्ती उचलत आहे. पगारही एटीएममधून काढला जातो. खाते काढतानाही अंगठेबहाद्दर शिपायाचा मोबाईल क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे त्याचे खाते असले तरी त्याला पैसे किती आले अन् किती गेले, स्वतःचे बँकेत खाते आहे की नाही याची पुसटशीही कल्पना नाही. विशेष म्हणजे हा प्रकार तब्बल १० वर्षांपासून सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिक्षण विभागाशी संगनमत?

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात संगनमत असल्याशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. जिल्ह्यातील अशा शाळांची तपासणी शिक्षण विभागाकडून केली जाते. मग तपासणी करतानाही शिक्षण विभागाला हा प्रकार कसा दिसून आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे जर प्रकार असतील तर अशा शैक्षणिक संस्थांची तपासणी करून संबंधित दोषी शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मी स्वतः जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा केली. सुनावणी घेऊन गुणवंत भगवान राऊत यांची नियुक्ती रद्द करण्याचे ठरले आहे. त्यांचा दाखलाही बनावट आहे. हा प्रकार सांगितल्यानंतर शिक्षण विभाग जागा झाला आहे. याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने दिले आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील अशा घटकांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
- महेंद्र धुरगुडे, जिल्हा परिषद सदस्य.

आमच्यास्तरावर याची चौकशी झाली आहे. पगार मिळणाऱ्या व्यक्तीला आपण नोकरीवर असल्याचे माहिती नाही. त्याचा पाचवी पासचा दाखलाही बनावट असल्याचे प्राथमिकस्तरावर दिसून आले आहे. त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठविला आहे. आता यावर वरिष्ठ स्तरावरून कारवाई होईल.
- गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com