मुंबई : शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ.राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे देखील पहा :
"ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद (Aurangabad) येथील महावितरणचे (MSEB) सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत," असे ही डॉ. राऊत म्हणाले.
"माननीय आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ध्वनीफितीबद्दलच्या बातम्यांची मी दखल घेतली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. या ध्वनिफितीतील संवाद व भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणा-या एका पक्षाचे ३० वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे,"असा टोलाही त्यांनी लगावला.
दोन मीटरचे वर्षभरात १० लाख बिल भरले असे लोणीकर म्हणत असले तरी गेल्या सव्वा वर्षांपासून त्यांनी विजेचे बिल भरले नाही. लोणीकर हे १० लाख वीज बिल भरल्याचे सांगत असले तरी त्यांच्या दोन्ही घरांची थकबाकी जवळपास ४ लाख आहे. लोणीकर यांनी महावितरणच्या अधिका-यांना निलंबित करण्याची धमकी देणे हा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा व शासकीय अधिका-यांवर चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्याचा प्रकार आहे, असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीतील नेत्यांना सातत्याने इनकम टॅक्स आणि ईडी यांच्या धाडी टाकण्याची धमकी भाजप नेते देत असतात. आता ही धमकी अधिका-यांनाही देण्यापर्यंतची पातळी या नेत्यांनी गाठली हे अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला हे शोभणारे नाही. त्याबद्दल लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिका-यांची माफी मागायला हवी. दलित वस्त्यांबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. यावरून त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही डॉ. राऊत यांनी केली.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.