OBC students government land at one rupee Maharashtra : ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात त्यासाठी महसूलसह सर्व शासकीय विभागांच्या जागा थेट 'एक रुपया' दरात उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश सर्व संबंधित विभागांना दिले आहेत.
मुंबईत पार पडलेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या 'महाज्योती' (Mahajyoti) या संस्थेसाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून वर्षभर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचा, अभ्यासाधिकाऱ्यांचा आणि सामाजिक वास्तूंचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
गेल्या बैठकीत चर्चा झालेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेताना प्रशासनाची चालढकल खपवून घेतली जाणार नाही. ओबीसींच्या विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा बावनकुळे यांनी दिला. ओबीसी समाज मंत्रिमंडळ उपसमितीची पाचवी बैठक मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध १२ मुद्दांवर चर्चा झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री गणेश नाईक, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यासह इमाव विभागाचे उपसचिव, सहसचिव व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले, मंत्रीमंडळ उपसमितीच्या प्रत्येक बैठकीत किमान दोन प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले पाहिजेत. त्याबरोबरच परदेशी शिष्यवृत्तीचा प्रस्ताव तातडीने मंजूरीसाठी पाठवावा. ओबीसी समाजातील आत्महत्या केलेल्या १६ नावांसह पुढील समितीत प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात यावा. महाज्योतीसाठी ३०० कोटींचा निधी, वसतीगृह योजना, वनार्टी यांचे सर्व प्रस्ताव मंजूरीसाठी देण्यात यावेत.
वनमंत्री गणेश नाईक यांनी ओबीसी समाजाचा शासकीय सेवेतील प्रलंबित असणारा संपूर्ण बँकलॉग त्वरित भरून काढण्याची आग्रही मागणी केली. इतर घटकांप्रमाणेच ओबीसी समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसी महामंडळालाही सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 'बार्टी'च्या धर्तीवर 'क्रांतीज्योती महात्मा फुले समता भवन' सुरू करण्यात यावे व त्यासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करून पुढील बैठकीत सादरीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महात्मा फुले लिखित 'तृतीय रत्न' या नाटकाच्या राज्यभरातील प्रयोगांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची सूचनाही भुजबळ यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.