संजय गडदे, साम टीव्ही | मुंबई २७ जानेवारी २०२४
२७ जानेवारी २०२४ हा दिवस मराठा समाजासाठी आनंदोत्सव घेऊन आला. कारण, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं. त्यांनी केलेल्या जवळपास सर्वच मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या. ही बातमी कळताच यामुळे संपूर्ण राज्यभरात मराठ्यांनी जल्लोष सुरू केला. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर ओबीसी नेत्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
" मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणाचा लढा तीव्रतेने लढला. त्यांना मराठा बांधवांनी प्रचंड प्रतिसाद देखील दिला. एक प्रकारे त्यांनी ही लढाई जिंकली, परंतु तहामध्ये माञ ते हरले, असेच चित्र उभे ठाकले आहे", अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली.
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या त्यांच्या मावळ्यांना, वंचित बहुजन आणि बारा-बलुतेदार समाजाच्या ताटातील १७ भाकरींमध्ये वाटेकरी होऊन मराठा समाजाने असा कुठला विजय प्राप्त केला", असा सवालही राठोड यांनी विचारला आहे. (Latest Marathi News)
"मनोज जरांगे यांच्या लढ्याला जरी यश मिळाले असेल, तरी निश्चितच मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर, भूकंपाचे धक्के दिलेत", अशी खंतही राठोड यांनी व्यक्त केली आहे.
"राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की, आम्ही काही झालं तरी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आता माञ मराठा समाजाला सगेसोयाऱ्यांना कुणबीचे दाखले देऊन ओबीसींवर अन्याय केला", अशी टीका देखील राठोड यांनी सरकारवर केली.
"सरकारने सग्यासोयऱ्यांना कुणबीचे दाखले दिल्यामुळे ओबीसी समाजावर हा प्रचंड अन्याय झाला आहे. ओबीसींच्या ताटातील आरक्षण ओढून घेण्याचा हा प्रकार आहे. आम्ही सांगत होतो की, मराठा बांधवांना न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या नियमानुसार ओबीसी आरक्षणाचे विभाजन करून आरक्षण द्यावे".
जेणेकरून सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय मिळाला असता, असंही राठोड म्हणाले. "या सर्व प्रकरणाला जितके सरकार जबाबदार आहे, तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा", अशी मागणी देखील हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.