

सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा दावा
विजय वडेट्टीवारांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
काँग्रेसने माझं ओबीसी प्रमाणपत्र दाखवावं असं त्या म्हणाल्या
'राज्यातील अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवले आहे.', असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवारांच्या या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या ओबीसी प्रमाणपत्रा संदर्भातील वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर दिलं आहे. 'काँग्रेसने माझं ओबीसी प्रमाणपत्र दाखवावं.', असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी वडेट्टीवार यांच्या दाव्यावर सवाल उपस्थित केला. विजय वडेट्टीवार यांनी आणखी कोणकोणत्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहेत यांची नावं नाही घेतली. पण आता हे नेते आहेत तरी कोण याची चर्चा होऊ लागली आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांना थेट उत्तर दिलं आहे. 'माझ्याकडे माझं जन्म प्रमाणपत्र आहे. माझ्याकडे डीग्रीचे प्रमाणपत्र, माझ्या लग्नाचे प्रमाणपत्र आणि बारामतीची खासदार असल्याचे प्रमाणपत्र आहेत. रोज उठून काँग्रेस अशा प्रकारचे आरोप का करत आहे? याबाबत मला आश्चर्य वाटत आहे. माझ्याकडे कोणतंच ओबीसी प्रमाणपत्र नाही. काँग्रेसने माझं ओबीसी प्रमाणपत्र दाखवावं. काँग्रेस पक्षाकडून मला दररोज टार्गेट केले जात आहे. याबाबत महाराष्ट्र काँग्रेसला विचारावं लागेल हे दुर्दैवं आहे.', असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं.
विजय वडेट्टीवार यांनी दावा केला होता की, भाजचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे -पाटील यांच्याकडेच फक्त ओबीसी प्रमाणपत्र नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचे प्रमाणपत्र आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील ओबीसी प्रमाणपत्र आहे. शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही हे मला माहिती नाही.' दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा जो दावा केला जात आहे त्यावर ठाकरेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'नियमात बसत असेल तर वावगं काय? नियमाने प्रमाणपत्र मिळत असेल तर हरकत काय?'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.