महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली. सर्वाधिक जागा भाजपला, तर त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या जागा निवडून आल्या. हे न भूतो...असंच यश म्हटलं जात आहे. पण विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी देशव्यापी मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. तर शरद पवार यांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. इतकंच काय तर, ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनीही आज, मंगळवारी झालेल्या बैठकीत सूतोवाच केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. त्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर संपूर्ण देशात मोहीम राबवू, असे ते म्हणाले.
ओबीसी, एससी, एसटी, मागास प्रवर्ग जे मतदान करतात, ते वाया जात आहे. त्यामुळं सगळं जाऊ द्या. यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी आम्ही मागणी करतो, असे खरगे म्हणाले. ईव्हीएम मशीन त्या लोकांना आपल्या घरी ठेवू द्यावे. अहमदाबादमध्ये बरीच गोदामे आहेत. तेथे त्या मशीन ठेवा. आमची एकच मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. तेव्हाच आपण कुठे आहोत, हे त्या लोकांना कळेल, असेही खरगे म्हणाले.
आमच्या पक्षाने अशा प्रकारची एक मोहीम सुरू केली पाहिजे. इतर सर्व पक्षांनाही सोबत घेतलं पाहिजे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आपण संपूर्ण देशात ही मोहीम राबवू, असे सांगतानाच खरगे यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला. पंतप्रधान मोदी हे जातनिहाय जनगणना करण्यास घाबरतात. पण समाजातील प्रत्येक घटकाला आपला वाटा हवा आहे. ते तशी मागणी करत आहेत, हे मोदींना समजायला हवं, असंही खरगे म्हणाले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर विरोधक असलेल्या महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे. बॅलेट पेपरवर मतदान झाल्यानंतर योग्य निकाल येतील असं सांगितलं.
ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूतोवाच केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडी एकत्रित येऊन ईव्हीएम विरोधात आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पराभूत आमदारांनी ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळावर तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाले. महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलून ईव्हीएम मशीनसंदर्भात ते आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
मी स्वतः ईव्हीएमद्वारे घेतलेल्या मतदानावर चार वेळा निवडून आले आहे. ठोस पुरावे आले पाहिजेत असं माझं मत आहे. पण ग्राउंडवरून जी माहिती येत आहे ती धक्कादायक आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला हव्यात ही आधी पण माझी मागणी होती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रोहित पवार यांनीही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही असेच झाले तर, मग आपण गुलाम बनून राहू. पण विरोध होत असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घ्यायला हव्यात. कारण आपल्या देशात लोकशाही आहे. संविधानानं देश चालायला हवा, असे रोहित पवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी थेट ईव्हीएम चौकशीची मागणी केली आहे. भोसरी मतदारसंघात मतांमध्ये तफावत आढळून आली आहे. मग आता ही मते आली कुठून? आता अनेक प्रकरणे बाहेर येतील लोक खणून काढतील. सर्व व्हीव्हीपॅटची तपासणी व्हावी असे आजही आमचे स्पष्ट मत आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. ईव्हीएम चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. माणसांनी तयार केलेल्या मशीनवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.