सागर निकवाडे
नंदुरबार : सकाळी शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला. वाल्हेरीहून तळोदाच्या दिशेने जात असलेली बस पलटी झाल्याने अपघात झाला. यात बसमधील २५ ते ३० विद्यार्थी जखमी झाले असून यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी विधानसभेचे आमदार राजेश पाडवी दाखल झाले आहेत.
नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाल्हेरी येथे मुक्कामी बस असल्याने या बसने रोज विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जात असतात. त्यानुसार आज देखील वाल्हेरी येथून तळोद्याकडे जाणारी विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी साधारण ६.३० वाजता निघाली होती. या बसमध्ये ७० ते ७५ विद्यार्थी प्रवास करत होते.
तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
दरम्यान गावातून बस मार्गस्थ झाल्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरावर बस भवर फाट्याजवळ पोहचल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी होऊन बसला अपघात झाला. या अपघातात २५ ते ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर जखमीतील ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आमदार पाडवी यांनी घेतली जखमींची भेट
अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, तळोदा येथे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर गंभीर जखमींवर अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर आमदार राजेश पाडवी यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.