केंद्र सरकारच्या प्रस्तावित 'डिलिमिटेशन' (सीमांकन) बिलाला पक्षाकडून पाठिंबा मिळण्याच्या शक्यतेवर नेत्या नताशा आव्हाड यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट करून पक्षाच्या भूमिकेचा निषेध केला आहे. माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते, असे त्या म्हणाल्या.
आपल्या भूमिकेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, वाढत्या लोकसंख्येनुसार सीमांकन आवश्यक असले, तरी हे प्रस्तावित बिल विरोधी पक्षांच्या जागा मर्यादित करून भाजपला राजकीय फायदा मिळवून देणारा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजप आपली घसरत चाललेली लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी असा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, या बिलाला पाठिंबा देणे म्हणजे संविधानाशी प्रतारणा ठरेल, असे म्हणत पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो, असे ट्वीट नताशा आव्हाड यांनी केले. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याच्या विचाराचा नताशा आव्हाड यांनी तीव्र निषेध केला. दरम्यान, यावर सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. नवीन पिढीत या गोष्टी असू शकतात. पिढी बदलत आहे प्रत्येक घरात काय असतं ते त्यांच्या घरात ठरवले जाते. मी माझ्या घरातल्या यांच्या बाहेर नाही, असे त्या म्हणाल्या.
डिलिमिटेशन वादात शिवानी वडेट्टीवार यांची उडी; नताशा आव्हाड यांच्या ट्विटला पाठिंबा
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमन बिलावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनीही उडी घेतली आहे. नताशा आव्हाड यांनी आपल्याच पक्षाच्या भूमिकेवर आक्षेप घेत केलेल्या ट्विटला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी रिट्विट करत पाठिंबा दर्शवला आहे.
आपल्या पोस्टमध्ये शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, "पक्षनिष्ठेचा अर्थ आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला गप्प बसवणे असा होऊ शकत नाही. मतदारसंघ पुनर्रचनेबाबत स्वतःच्याच पक्षाच्या भूमिकेवर प्रामाणिकपणे मत मांडल्याबद्दल नताशा आव्हाड यांचा आदर वाटतो." तसेच, जेव्हा संवैधानिक प्रश्न निर्माण होतात, तेव्हा स्वतःच्या बाजूलाही प्रश्न विचारण्याचे धाडस करणाऱ्या अशा अधिक आवाजांची आपल्याला गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.