नाशिकरोडच्या जेलरोड परिसरात हृदयद्रावक घटना घडली
साडेअकरा महिन्यांच्या रिवा ठाकरेचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू
बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत तोल जाऊन पडली
कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले
नाशिकरोडच्या जेलरोड परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरात खेळत असताना बाथरूममधील पाण्याच्या बादलीत पडून साडेअकरा महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रिवा ठाकरे असे या मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रिवाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोडच्या जेलरोड परिसरात ठाकरे कुटुंब राहतं. या कुटुंबात १ वर्षांपूर्वी रिवाचा जन्म झाला.मात्र पहिला वाढदिवस साजरा होण्यापूर्वी तिच्यावर काळाने घाला घातला. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास रिवा घरात खेळत होती. यावेळी खेळता खेळता ती बाथरूममध्ये गेली. तिथे पाण्याने भरलेल्या बदल्या होत्या.
रिवाचा नकळतपणे तोल गेला आणि ती बादलीत पडली. ही बाब कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी आणि उपचारादरम्यान रिवाला मृत घोषित केले. या घटनेने ठाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुःखाची गोष्ट म्हणजे रिवाच्या पहिल्या वाढदिवसाला आठ दिवस शिल्लक होते. घरात तिच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. मात्र, वाढदिवसाच्या आनंदाऐवजी कुटुंबावर शोककळा पसरली. ज्या घरात काही दिवसांनी चिमुकलीच्या वाढदिवसाचा आनंद साजरा होणार होता, त्याच घरात दुःखाचं वातावरण तयार झालं होत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.