Nashik Crime Bhushan Londhe: उत्तर प्रदेशातही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'; कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिकमधला गुन्हेगारांचा आका भूषण लोंढे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तरप्रदेशात ही कारवाई करून लोंढेला ताब्यात घेतले. गेल्या दोन महिन्यांपासून लोंढे पोलीस यंत्रणेला गुंगारा देत होता. भूषण लोंढेवर गोळीबार, खंडणी, धमकावणे, जीवे मारण्याचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यातही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात लोंढेचा भाऊ दीपक लोंढे आणि वडील प्रकाश लोंढेला नाशिक पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. अटकेच्या वेळी पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी भूषण लोंढेने तब्बल ३४ फूट उंचीवरून उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून अटकेनंतर त्याच्या पायाला प्लास्टर करण्यात आलेले असल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. अटकेनंतर भूषण लोंढेनेदेखील “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” असे म्हणने पसंत केले.
नेमके प्रकरण काय?
दोन महिन्यापूर्वी शहरातील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली होती. बिअरबारमध्ये झालेल्या वादातून थेट गोळी झाडण्यात आली होती. यामध्ये विजय तिवारी (वय20) या तरुणाच्या मांडीत गोळी घुसली आणि तो गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निकटवर्तीय असलेल्या प्रकाश लोंढेला आणि त्याचा मुलगा भूषण लोंढे याच्यासह आठ ओळखीचे आणि चार अज्ञात अशा एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तिघांना अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण लोंढे, शुभम पाटील उर्फ भुऱ्या, प्रिन्स सिंग, दुरगेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत डांगळे, राहुल गायकवाड, सनी विठठलकर, शुभम निकम, वेदांत चाळगे आणि इतर चार ते पाच आज्ञातांविरोधात खंडणीसाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, हॉटेलमध्ये नेहमीच होणारे भांडण मिटवण्यासाठी खंडणी रुपात भागीदारीची मागणी करण्यात आली होती. भूषण लोंढेने बारमध्ये झालेल्या भांडणातून गोळीबार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. खंडणी मागत गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली होती. आता याच प्रकरणी भूषण लोंढे पोलिसांच्या तावडीत आला असून उत्तरप्रदेश येथील नेपाळ बोर्डरवरून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
