'रमी खेळा अन् जिंकलेले पैसे मला पाठवा', तरूण शेतकऱ्याने कृषीमंत्र्यांना पाठवले ५५५० रुपये
काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. मात्र, त्यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, नाशिकच्या एका तरूण शेतकऱ्यानं कोकाटेंना मनी ऑर्डर पाठवले आहेत. 'माझ्यासाठी रमी खेळा अन् जिंका ते पैसे मला पाठवा', असं म्हणत तरूणानं कृषी मंत्र्यांना ५,५५० रूपयांची मनी ऑर्डर केली आहे.
राजेंद्र खुळे असे तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. तो नाशिकच्या निफाड तालूक्यातील पूर्व भागातील देवगाव येथील रहिवासी आहे. तो काही दिवसांपासून शेती विषयक समस्यांपासून त्रस्त आहे. या तरूण शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचल्यानं शेती करणे अवघड झाले आहे. पेरणीसाठी त्याने घेतलेले सोयाबीन पेरता आले नाही.
महागडे विकत घेतलेले बियाणे तसेच पडून आहेत. याकारणामुळे त्यानं सोयाबिन विक्री करत त्यातून मिळालेल्या ५ हजार ५५० रुपयांची मनी ऑडर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठवली आहे. तसेच मनी ऑर्डर करत त्यासोबत एक संदेशही पाठवला आहे. 'कृषी मंत्र्यांनी माझ्यासाठी एका रमीचा डाव खेळावा. तो जिंकून मला पैसे पाठवावे', असे आवाहन यावेळी तरूण शेतकऱ्यानं केले आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे दौऱ्यावर
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असताना, त्या ठिकाणी राजकीय वातावरण अचानक तापलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले हे आपल्या कार्यकर्त्यांसह हॉटेलसमोर दाखल झाले. त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करत मंत्री कोकाटेंचा निषेध केला.
याचवेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारीही आंदोलनासाठी हजर झाले. त्यांनीही मंत्र्यांच्या विरोधात संताप व्यक्त करत निषेध आंदोलनात सहभाग नोंदवला. यामुळे काही वेळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजावत शांतता राखण्याचं आवाहन केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.