पराग ढोबळे, साम टीव्ही
कोर्टात युक्तिवाद सुरु असताना वकिलाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. न्यायाधीशांसमोरच ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नागपूर शहरात घडली. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
लत इक्बाल कुरेशी असं मृत वकिलांचं नाव आहे. या घटनेमुळे यामुळे विधी क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर (Nagpur News) येथील जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी दुपारच्या सुमारास एका केसमध्ये युक्तीवाद सुरु होता.
वकील तलत इकबाल कुरेशी आपल्या पक्षकाराची बाजू मांडत होते. त्याचवेळी अचानक कुरेशी यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आल्याने ते कोर्टातच कोसळले. या घटनेनं न्यायालयात मोठी खळबळ उडाली.
स्वत: न्यायाधीश एस.बी. पवार यांनी डायसवरून खाली उतरून कुरेशी यांना पाणी पाजले. फोन करुनही रुग्णवाहिका वेळेत न आल्याने न्यायाधीशांनी आपल्या खासगी कारमधून कुरेशी यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच वाटेतच कुरेशी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अचानक मृत्युमुळे विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोना महामारीत कुरेशी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते एकटेच राहत होते. त्यांच्या दोन्ही मुली विवाहित आहेत.
जिल्हा न्यायालय संकुलात दररोज 8 हजार वकील कामासाठी येतात. न्यायालयीन कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कोर्टात दररोज 30 ते 40 हजार लोक केससाठी येतात. अशा स्थितीत रुग्णवाहिका व प्रथमोपचाराची सुविधा असावी. शासनाने येथे प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी डीबीएचे माजी अध्यक्ष कमल सतुजा यांनी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.